कृषी

शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद ! शुल्कवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Published by
Ahmednagarlive24 Office

Onion News : केंद्र सरकारने कांदा पिकावर ४० टक्के नियात शुल्क लावल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना व परीसरातील शेतकऱ्यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केटचा लिलाव बंद पाडून शासनाच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत लिलाव बंद ठेवावा, असे निवेदन मार्केट कमेटीला देण्यात आले. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सरकारविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत.

अनेक ठिकाणी आंदोलनाची सुरुवात होत असून सरकार विरोधात हे आंदोलन नजीकच्या काळात पेटण्याची चिन्हे दिसत आहे. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन केंद्र सरकारने तातडीने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

अगोदरच दुष्काळी परिस्थिती त्यात शेतकऱ्यांनी भाव मिळण्याच्या आशेने एवढ्या दिवसाचा कांदा साठवणूक केली असता केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

केंद्र सरकारने निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेतला नाही, तर दि. २५ ला ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. घोडेगाव कांदा असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा देऊन बुधवार ता २३ रोजी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ahmednagarlive24 Office