Agricultural News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, कोपरे, साकेगाव, सुसरे, पागोरी पिंपळगाव, पाडळी आजतागायत मोठा पाऊस झालेला नाही. तालुक्यातील भागातील नद्या, नाले व विहिरी कोरड्याठाक आहेत. तालुक्यात जून अखेरीस झालेल्या अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली.
हजारो रुपये खर्च करून बी-बियाणे, खते विकत घेतली. पिकेही चांगली बहरली, त्यावर पुन्हा किटकनाशके फवारणी केली, अतिशय कष्टाने पिकांचे व्यवस्थापन केले. मात्र, दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णता पाठ फिरवली आहे. केवळ झिमझिमवर समाधान मानावे लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणहीदेखील गायब झाले आहे. सकाळपासूनच ऊन व वाऱ्यामुळे पाऊस पडण्याच्या आशा जवळपास मावळल्या जमा आहेत.
परिणामी मका, सोयाबीन, बाजरी आदी पिके शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेले पशुधन जगवायचे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शेतीपूरक दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.
परंतु पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवत असून, याचा दूध संकलनावर परिणाम झाला आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन दुष्काळ जाहीर करून प्रति एकरी पिकनिहाय आर्थिक मदत करावी. तसेच विमा कंपन्यांनी पाण्याअभावी जळालेले पिकांचे पंचनामे करून विम्याची भरपाई द्यावी.
त्याचप्रमाणे परिसरातील पशुधनाची गणना करून चाऱ्यासाठी अर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. आजमितीस पाऊस झाला तरी पिकांना त्याचा उपयोग होणार नाही. कारण पिकांची पाण्याअभावी वाढीची अवस्था संपल्यात जमा आहे.
पिके पूर्णता कोमेजून गेलेली आहेत, त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. शासनाने या परिस्थितीची विचार करून तालुक्यात दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी आदिनाथनगर येथील शेतकरी सतीश उगले यांनी केली आहे.