Maharashtra Farmers News : राज्यात ३ जुलैपर्यंत १४०.९ मि. मी. (५८.८ टक्के) पाऊस पडला असून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे राज्यातील १४२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ प्रत्यक्षात ९.४६ लाख हेक्टर (७ टक्के) क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्याशिवाय पेरणीच्या कामांना वेग येणार नसून, पेरण्या झालेल्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मागील तीन वर्षांतील मान्सूनचे आगमन जुलै महिन्याच्या सुरुवातीला होत असल्याने कृषी विभागाने १५० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशा सूचना केल्या होत्या.
राज्यातील अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये पेरणीयोग्य पावसाने ओढ दिली आहे. अहमदनगर, धाराशिव, अमरावती, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पेरण्या रखडल्या असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगाम १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार, २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १५ लाख ९२ हजार ४६६ क्विंटल ( ८२ टक्के) बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.
त्यामुळे राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, ४३.१३ लाख मेट्रिक टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून, आतापर्यंत ४४.१२ लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.
त्यापैकी १६.५३ लाख मेट्रिक टन खताची विक्री झाली असून, सद्यस्थितीत राज्यात २७.५९ लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करण्याच्या सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी
राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तसेच राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत.