Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जूनच्या अखेरीस झालेल्या अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरण्या केल्या, परंतु जुलै महिना अर्धा सरला तरी अजून दमदार पाऊस झालेला नाही.
पावसाअभावी दोन पानांवर उगवून आलेली कपाशी सध्या वाऱ्यामुळे भिरभिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतातुर नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे आस लावून पावसाची वाट बघत आहेत. शेवगाव तालुक्यातील एकूण कपाशी लागवडीखालील ४२ हजार ५४२ हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक १४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर बोधेगाव कृषी मंडळात कपाशी लागवड होते.
या मंडळामध्ये जूनच्या अखेरीस झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह उडीद, सोयाबीन, मूग बाजरीची पेरणी केली. जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, परंतु लागवड होऊन दोन आठवडे उलटले तरी या भागात अजून दमदार पाऊस झालेला नाही.
दिवसभर आभाळ भरून येतंय अन् नुसताच वारा सुटतोय, पण पावसाचा थेंब काही पडेना, म्हणत भिरभिरणाऱ्या कपाशीकडे बघत बघत शेतकरी कोरड्या रानांत काळजावर दगड ठेवून आंतरमशागती करत आहेत.
पावसाअभावी सध्या मात्र जमिनीत पुरेशी ओल नसल्याने कपाशी सुकून चालली आहे. हलक्या जमिनीवरील कपाशी जळून जाण्याची शक्यता वाढली आहे. चार-पाच दिवसांत जर पाऊस झाला नाही तर संपूर्ण खरीप पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
सध्या तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे दिसते. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ज्या भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. तेथील पीक परिस्थितीचे कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
बोधेगाव कृषी मंडळांतर्गत २२ हजार २१२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १४ हजार ८८० हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. सध्या पिके बरीआहेत, परंतु पाऊस आवश्यक आहे.