Agricultural News : नगर तालुक्यातील कामरगाव येथे कोबी पिकाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, सदर कंपीनकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वसंतराव ठोकळ व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
कामरगाव येथील शेतकरी तथा मा. सरपंच वसंतराव ठोकळ यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रात कोबीची कलमे लावली होती. त्यासाठी लागणारी आवश्यक खते व औषधांची फवारणीही केली होती. साधारणपणे ८० ते ८५ दिवसात पोषित फळधारणा झाली नाही व आलेली फळे कुपोषित असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली.
कृषी विभागाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क साधला व त्यानुसार दि. १० रोजी उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर यांच्यासह कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी सौ. डी. पी. पाटील, डॉ. राजेंद्र गेठे, प्रा. अन्सार खान आत्तार, कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब आठरे, प्रतिभा राऊळ, गुणनियंत्रण निरीक्षक एन.के. ढेरंगे यांनी ठोकळ यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली असता,
त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. ज्या कंपनीने बियाणे पुरविले होते, त्या कंपनीचे बियाणे संतोष ढवळे, विलास ठोकळ यांच्या कोबी पिकाची समांतर पाहणी केली असता, अपेक्षित फळधारणा झाली नसल्याचे, फळे कुपोषित असल्याचे निदर्शनास आले.
विद्यापीठ संशोधन टिमचा अहवाल आल्यानंतर ठोकळ व इतर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता बळावली आहे. पीक पाहणीसाठी आलेल्या टिमसोबत सरपंच तुकाराम कातोरे, पोपट साठे, विलास ठोकळ, सुनील ठोकळ, संतोष ढवळे, गणेश पाचरे, रमेश पाचरे, संदिप कोल्हे, सुरज ठोकळ आदी शेतकरी उपस्थित होते.
मी दरवर्षी कोबी पिकाचे उत्पादन घेतो. यावर्षी १ हेक्टरमध्ये ८० ते ८५ टन माल निघणे अपेक्षित होते. त्यातून मला ८ ते ९ लाख रुपये मिळाले असते. माझा उत्पादन खर्च चार लाख झाला असून, कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यास मला न्यायालयात जावे लागेल.- वसंतराव ठोकळ (शेतकरी)
शेतकऱ्यांनी कोबी पिकाबाबत केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे, बोगस बियाणे वापरून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याबाबत विचार करू.:- पोपटराव नवले (उपविभागीय कृषी अधिकारी).