Agricultural News : पारनेर तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतातील उभी पिके, जनावरांचा चारा, फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले. याचे रितसर पंचनामे झाले, राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या घोषणाही केल्या. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे.
पारनेर तालुक्यात दि.२५ नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या गारपीट व पावसाने १० हजार ४५२ शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसला आहे. तालुका प्रशासनाने १० कोटी ५४ लाख रुपयांची रितसर मागणी ही राज्य शासनाकडे नोंदविली आहे.
मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह तुफान गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने नगर जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान पारनेर तालुक्यात झाले. शासनाच्या आदेशाने व आवाहनानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यामुळे त्वरीत नुकसान भरपाई मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले.
परंतु हा डिसेंबर महिनाही संपत आला तरी कश्याचाही पत्ता नाही. या गारपिटीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान पारनेर तालुक्यातील सांगवी सुर्या, वडुले, पानोली, गांजी भोयरे या गावांचे झाले, तर निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर या गावांना तडाका बसला आहे.
या अवकाळी गारपिटीच्या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यात सध्या शेती मालाला भाव मिळत नाही, मजूर वेळेवर उपलब्ध होत नाही, मजुरी ही वाढलेली, रासायनिक खतांच्या किमतीही भरमसाठ वाढलेल्या आहेत.
त्यामुळे सांगा शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? या परिस्थितीत शेतकरी आत्महत्या नाही करतील तर काय करतील? पारनेर तालुक्यातील गारपिटीच्या पावसामुळे ६५४३ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.
त्यात जिरायत क्षेत्र १०४३ हेक्टर, बागायत ४९४४ हेक्टर, फळबागा ५५५ हेक्टर क्षेत्र तर ४९ गावांमधील १०४५२ शेतकरी या भरडले गेले. तर एकंदरी नुकसान भरपाई १० कोटी ५४ लाख रुपये देण्याची गरज असल्याने ती लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. अन्यथा लाल फितीत किती दिवस लागतील याचा काही भरवसा नाही.