Farming News : गेल्या दोन वर्षांत भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा उभारल्या. एवढेच नाही तर काही उत्साही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सफरचंदाच्यादेखील बागा उभारल्या आहेत.
वर्षभर पाणी टिकून रहावे, यासाठी शेतकऱ्यांनी शेततळेसुध्दा तयार केली आहेत; परंतु यावर्षी जुलै महिना अर्धा संपला तरी पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, मिरी, कोलहार, या भागात कुठेही पेरणीयुक्त पाऊस झालेला नाही,
ज्या शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसावर पेरणी केली, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
इतर राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उडीद, मूग, या पिकांच्या पेरणीचा मुहूर्त हुकला आहे. आता बाजरी, कपाशी, तूर, या पिकांच्या पेरणीसाठी बळीराजा पेरणीयुक्त पावसाच्या प्रतीक्षेत आहे;
परंतु पेरणीयुक्तदेखील पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मागील दोन वर्षे तालुक्यात जुलैपर्यंत सर्व नदी- नाले ओसांडून वाहत होते, सर्वत्र पाणी पाणी झाले होते. यावर्षीदेखील भरपूर पाऊस होईल,
अशी मोठी अपेक्षा बळीराजाला होती. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पिकांसह फळबागांचे नियोजन केले होते; परंतु यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षात फळबागा उभ्यारल्या होत्या, फळबागांचे काय होणार,
असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. पासाळ्याचा दीड महिना उलटला तरीदेखील तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी- नाले पाझरतलाव कोरडेठाक असून, पिण्याच्या पाण्याचादेखील प्रश्न गंभीर झाला असून,
शेततळ्यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे आता बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस लांबल्यामुळे आर्थिक उलाढालीलादेखील काहीसा ब्रेक लागला असून, पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत.