Crop Loan:- पीक कर्ज हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून शेतीचे कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी किंवा शेतीसाठी लागणारा पैसा वेळेत उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून पीक कर्जाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
अशावेळी शेतकऱ्यांच्या हातात पुढील हंगामाच्या तयारीसाठी पैसा शिल्लक राहत नाही व अशावेळी पीक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. परंतु आता शेतकऱ्यांना मिळणारे हे पीक कर्ज अगोदर पेक्षा कमी मिळणार आहे व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे नाबार्डच्या माध्यमातून काही निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मिळेल अगोदर पेक्षा कमी पीककर्ज
8अ च्या शेत जमिनीचा जो काही मालकी उतारा आहे त्या उताऱ्यावर तुमच्या वाट्याला किंवा तुमच्या मालकीचे जेवढे क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्राचे आता पीक कर्ज यावर्षीपासून मिळणार आहे.
त्यामुळे गावातील सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून प्रत्येकाचे आठ अ चा उतारा जमा करण्याची मोहीम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरात सुरू करण्यात आली असून आठ अ चा निकष लावल्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज अगोदरपेक्षा कमी प्रमाणात मिळणार आहे.
यामागील प्रमुख कारण जर बघितले तर बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांच्या उताऱ्यावर एकत्रित कुटुंबातील बऱ्याच जणांची नावे आहेत व ती हक्क सोडपत्र केल्याशिवाय कमी होणार नाहीत.
आतापर्यंत जर आपण बघितले तर जो शेतकरी सेवा संस्थेला सभासद होता त्याच्या उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे ते विचारात घेतले जायचे व त्यानुसार शेतकऱ्याला पीक कर्ज मंजूर केले जात होते. परंतु आता यामध्ये नाबार्डने पीक कर्ज वाटपासाठीचा निकष बदलला आहे. त्या निकषानुसार आता यावर्षीपासून पीक कर्ज वाटप होणार आहे.
काय आहे नेमका हा निकष?
आपल्याला माहित आहे की, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील जर कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्यानंतर मात्र संबंधित व्यक्तीच्या वारसांची नावे शेत जमिनीला वारसा हक्काने लागतात. यामध्ये पीक कर्ज देताना सेवा संस्थेला जो सभासद आहे त्याच्या नावावर असलेल्या 8 अ च्या उताऱ्यावर सर्वच क्षेत्र विचारात घेऊन पीक कर्ज वाटप अगोदर केले जात होते
परंतु आता बदललेल्या निकषानुसार तसे होणार नाही. हे जर उदाहरणाने समजून घ्यायचे राहिले तर समजा एका शेतकऱ्याला तीन एकर म्हणजेच 120 गुंठे क्षेत्र असेल आणि त्याचे निधन झाल्यावर शेतकऱ्याची पत्नी तसेच त्याची दोन मुले व चार बहिणी असे वारस असतील तर शेतकरी असलेल्या त्याच्या भावाच्या वाट्याला फक्त 17 गुंठे जमीन येऊ शकते व त्यामुळे त्याला तेवढ्याच सतरा गुंठ्याचे क्षेत्राचे पिक कर्ज मिळेल.
म्हणून अगोदर सारखे तीन एकर क्षेत्राचे मिळणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे जर 8अ उताऱ्यावर जितके वारस असतील त्या वारसामध्ये एकूण जमिनीपैकी जेवढे क्षेत्र कर्ज घेणाऱ्याच्या वाट्याला येत असेल तेवढ्याच क्षेत्राचे कर्ज त्याला मिळेल.त्यामुळे आता याबदललेल्या निकषाने पीक कर्ज हे कमी मिळेल.
अगोदर जर शेत जमिनीवर बहीण किंवा पत्नी यांची नावे असतील तर त्यांचे संमतीपत्र घेऊन पीक कर्ज मंजूर केले जात होते. परंतु आता तसे होणार नाही.
वारसा हक्काने शेत जमिनीला लागलेले बहिणी तसेच पत्नी यांची नावे जर आता कमी करायचे असतील तर त्यांचे हक्क सोडपत्र करावे लागणार आहे. त्यामुळे या बदललेल्या निकषाचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार नाही हे मात्र निश्चित.