Agricultural News : यावर्षी पावसाळयाचे दोन महिने संपले तरी दमदार पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, अल्प पावसावर शेतकऱ्यांनी उधार उसणवारी करून पेरणी व लागवड केली; परंतू पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत,
त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, सुसरे, पागोरी पिंपळगाव, माळेगाव, खेर्डे, साकेगाव, सोमठाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, सोयाबीन, मूग, बाजरी, मटकी, उडीद पिके घेतली जातात.
परंतू गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस नसल्यामुळे पिके कोमजू लागली आहेत तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी सावकारांकडून पैसे काढून लागवड पेरणी केली आहे तसेच अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते घेऊन ठेवली आहेत; परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातून जाऊ लागली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
काही ठिकाणी सत्तर टक्के पिके पावसाअभावी जळून चालली आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पंचनामे करून तत्काळ हेक्टरी शासकीय अनुदान जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ढाकणे यांनी केली आहे.