कृषी

Poultry Management: कोंबड्यांमधील ‘फाऊल टायफॉईड’ आजार आहे खतरनाक! अंडी उत्पादन व कोंबड्यांचे वजन होते कमी, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Poultry Management:- सध्या कोंबडी पालन म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय हा परसातील कोंबडी पालन इथपर्यंत मर्यादित राहिला नसून या व्यवसायाला आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात असून कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग ही संकल्पना या व्यवसायात आल्यामुळे पोल्ट्री फार्म व्यवसायाची झपाट्याने वाढ झालेली आहे.

परंतु अजून देखील पोल्ट्री फार्म व्यवसायासमोर अनेक प्रकारच्या समस्या  असून त्यातीलच प्रमुख समस्या म्हणजे कोंबड्यांना होणारे विविध प्रकारचे आजार व त्यांचे नियंत्रण हे होय. कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार झाल्यामुळे आज देखील पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

अनेक प्रकारचे आजार हे कोंबड्यांना होत असतात व अशा आजारांच्या नियंत्रणावर खर्च देखील भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते.

याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये कोंबड्या तसेच बदक, मोर आणि कबूतर सारख्या इतर पक्षांमध्ये होणाऱ्या फाऊल टायफाईड या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. कोंबड्यांना हा आजार झाला तर कोंबड्यांची अंडी उत्पादन क्षमता कमी होते किंवा अंडी उत्पादन कमी होते व कोंबड्यांचे वजन कमी होते.

 कोंबड्यांमधील फाऊल टायफाईड   आजाराची लक्षणे

1- जर या आजाराचा प्रादुर्भाव पिल्ल्यांना झाला तर अशी बाधित पिल्ले दिसायला निस्तेज दिसतात व खाणे पिणे देखील बंद करतात किंवा कमी करतात.

2- तसेच पिल्लांना हगवण लागते व विष्टा पाण्यासारखी पिवळ्या रंगाची व चिकट दिसते.

3- तसेच पिल्लांच्या गुद्दाराच्या आजूबाजूला जे काही पंख असतात त्यावर विस्टा चिकटलेली दिसते.

4- तसेच कोंबड्यांना जर या आजाराची लागण झाली तर अशा कोंबड्यांना ॲनिमिया होतो व त्यांची अंडी उत्पादन क्षमता कमी होते. एवढेच नाही तर त्यांचे वजन देखील कमी होते व पंखे विस्कटलेले दिसतात.

5- तसेच कोंबड्यांचा तुरा आणि लोंब पिवळसर रंगाची दिसायला लागतात आणि सुकतात.

6- तसेच लागण झालेल्या कोंबड्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याची तहान लागते.

7- कोंबड्यांच्या लहान पिल्लांना जर या आजाराची बाधा झाली तर ते फिरणे बंद करतात व एका ठिकाणी गोळा होतात. तसेच पिल्लांची वाढ खुंटते. आतडे व मूत्रपिंडावर सूज देखील येऊ शकते.

8- लिव्हरचा रंग तांब्यासारखा होतो व त्यावर देखील सूज येते.

9- या आजाराचा परिणाम फुफ्फुसावर  देखील होतो व त्यावर भुऱ्या रंगाचे चट्टे दिसतात.

 कसे होते या आजाराचे निदान?

1- साधारणपणे लक्षणांच्या माध्यमातून या आजाराचे निदान करता येत नाही. परंतु प्रयोगशाळेमध्ये जीवाणूंचे विलगीकरण करून या आजाराचे निदान करता येऊ शकते.

2- दुसरी पद्धत म्हणजे या कोंबड्यांचे रक्तजल गुठळीकरण परीक्षण करून निदान करतात.

 काय आहे त्यावर उपचार?

1- ज्या कोंबड्यांना किंवा पिल्ल्यांना या आजाराची लक्षणे दिसत असतील त्या गटातील पिल्लांना खाद्यातून योग्य प्रति जैविक देणे गरजेचे आहे.

2- प्रति जैविक देताना कोणत्या प्रकाराचे द्यावे? त्याची मात्रा किती असावी आणि मात्रांचा कालावधी याबाबत पशुवैद्यकीय यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

 या आजाराचा प्रसार कसा होतो?

1- हा आजार प्रामुख्याने अंड्यांच्या माध्यमातून कोंबड्यांच्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होतो.

2- बाधित झालेली पिल्ले या आजाराचे प्रमुख स्त्रोत बनतात.

3- तसेच हॅचरीमध्ये अंडा उबवणूक जेव्हा होते तेव्हा बाधित पिल्ले किंवा दूषित उबवणूक यंत्राच्या माध्यमातून देखील प्रसार होतो.

4- ज्या अंड्यांमध्ये या आजाराचा जिवाणू संक्रमित झालेला असतो त्यांचा उबवणुकीचा दर हा कमी होतो.

5- तसेच ज्या कोंबड्यांना या आजाराची बाधा झालेली असते किंवा बाधा होऊन आजारातून कोंबड्या बऱ्या झालेल्या असतात अशा कोंबड्या जिवाणू संक्रमणाचा प्रमुख स्त्रोत असतात. तसेच बाधित पिल्लांच्या मल आणि मूत्रातून देखील आजार पसरतो.

6- एवढेच नाही तर शेडमध्ये काम करणारे कामगारांचे चप्पल किंवा बूट आणि कपडे इत्यादींच्या माध्यमातून देखील या आजाराचा प्रसार होतो.

7- या आजाराच्या जिवाणू ने दूषित असलेली उपकरणे तसेच खाद्य, पाणी, अस्वच्छ शेडच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार होतो.

 महत्त्वाचे

पिल्लांमध्ये जर या आजाराची लक्षणे दिसत असतील तर गटातील पिल्लांना खाद्यातून योग्य प्रतिजैविक द्यावे.

Ajay Patil