संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३-२४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य पेरणीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत किट दिले जात आहेत.
कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य बियाणांचे ६९ हजार ०६६ मिनी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, राळा आदी बियाणांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
मिनी किटमध्ये कोणते बियाणे मिळणार
ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा. कोदो, राजगिरा आदी बियाणे मिनी किटमध्ये मिळणार आहेत.
किती क्षेत्रासाठी किती बियाणे मिळणार
जिल्ह्यात मिलेट क्रॉप कॅफेटिरीया अंतर्गत ज्वारी १०० ग्रॅम, बाजरी ५० ग्रॅम, नाचणी ५० ग्रॅम व राळा १०० ग्रॅम, कोदो ५० ग्रॅम, राजगिरा २५ ग्रॅम असे एकूण ३७५ ग्रॅम वजनाचे ५ आर. क्षेत्रासाठी ३ हजार ५०६ मिनी किट तसेच ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत ६५ हजार ५६० पिकनिहाय, असे एकूण तालुकानिहाय ६९ हजार ०६६ मिनी किटचे मोफत वाटप होणार आहे.
तालुकानिहाय मिनी किटचे असे होणार वाटप
अहमदनगर- २९१०, पारनेर- ४१४५, पाथर्डी- ३५१०, कर्जत- ४३४०, जामखेड- ३५४१, श्रीगोंदा- ४०६०, श्रीरामपूर- ३५२०, राहुरी- ३७४०, नेवासा- ३६३०, शेवगाव- ३८७०, संगमनेर- ५१५०, अकोले- २०५०, कोपरगाव – ३२४०, राहाता- ३३५०, असे एकूण ६९ हजार ९९ तृणधान्यांचे मिनी किट शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
या अभियानातून उत्पादित होणारे तृणधान्य शेतकयांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे. तसेच बियाणे म्हणूनही पुढील वर्षी वापरता येईल. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह व पोटाच्या विकाराचे प्रमाणे वाढले आहे,
त्यामुळे आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, राळा अशा तृणधान्यांपासून बनलेल्या पदार्थाचे महत्त्वही वाढू लागले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तृणधान्य पिकाच्या बियाणे मिनी किटची लागवड करावी. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी