कृषी

Goat Breeds In India: शेळीपालनातून मिळवायचे लाखात उत्पन्न तर करा ‘या’ जातींच्या शेळींचे पालन! वाचा टॉप शेळीच्या जातींची माहिती

Published by
Ajay Patil

Goat Breeds In India:- भारतामध्ये शेळीपालन व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. कमीत कमी गुंतवणुकीत आणि कमीत कमी खर्चात करता येणारा हा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांकडून अगोदरपासूनच शेळीपालनाला पसंती मिळताना  आपल्याला दिसून येते.

सध्या पाहिले तर अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरी नसल्यामुळे शेतीकडे वळत आहेत व शेती सोबतच जोडधंदा म्हणून शेळीपालनाची निवड मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसून येत आहेत. शेळीपालनामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व उच्च व्यवस्थापनाच्या जोरावर जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान याला जितके महत्त्व आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व आहे शेळीपालमध्ये तुम्ही कोणत्या शेळीच्या जातीची निवड करत आहात? याला सर्वात जास्त महत्त्व असते.

भारतामध्ये अनेक प्रजातींच्या शेळ्या आहेत. परंतु त्यातील काही मोजक्या शेळ्यांच्या प्रजाती या शेळीपालनामध्ये जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवून देऊ शकतात अशा पद्धतीचे आहेत.

त्यामुळे आपण या लेखात अशाच काही महत्त्वाच्या शेळ्यांच्या जातींची माहिती घेणार आहोत. जेणेकरून नवीन शेळी पालन सुरू करणाऱ्या तरुणांना व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

 या आहेत भारतातील टॉप शेळ्यांच्या जाती

1- जमुनापारी शेळी शेळीची ही जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आढळून येते. या शेळ्या मोठ्या आकाराच्या असतात व त्यांचे पाय लांब व चेहऱ्यावरील प्रमुख रेषा व दुमडलेले मोठे लटकलेले कान हे शारीरिक वैशिष्ट्य असते.

या शेळीची कास ही मोठी असते. जमुनापारी शेळीची प्रतीदिवस दूध देण्याची क्षमता दोन ते अडीच लिटर इतकी असते. जमुनापारी शेळीच्या नराचे वजन हे 65 ते 80 किलो आणि मादी शेळीचे वजन 45 ते 60 किलोच्या दरम्यान असते.

2- मलबारी शेळी ही जात मूळची उत्तर केरळची असून या जातीच्या शेळीची त्वचा उत्तम दर्जाची असते. या शेळी पासून सरासरी दर्जाचे मांस उत्पादन मिळते.

तसेच दूध उत्पादन पाहिले तर दररोज 0.9 ते 2.8 लिटर पर्यंत दूध देते. एका वेतात सरासरी दूध उत्पादन 65 लिटर इतके असून तिचा स्तनपान कालावधी हा 172 दिवसांचा आहे.

3- बारबारी शेळी शेळीची ही जात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये आढळून येते. या जातीची शेळी प्रामुख्याने दूध आणि मांस उत्पादनाच्या उद्दिष्टाने पाळली जाते. बारबारी शेळीच्या नराचे वजन हे 35 ते 45 किलो दरम्यान असते तर मादी शेळीचे वजन पंचवीस ते पस्तीस किलोच्या दरम्यान असते.

या जातीची शेळी दररोज एक ते दीड लिटर दूध देते. या जातींची प्रजनन क्षमता देखील इतर शेळीपेक्षा चांगली असते. एका वेतात दोन ते तीन पिल्लांना जन्म देऊ शकते. या जातीची शेळी साधारणपणे 12 ते 15 महिन्याच्या अंतराने दोनदा व्यायते.

4- बिटल शेळी या शेळीची जात प्रामुख्याने उत्तरेकडील पंजाब राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. हिचा प्रामुख्याने दूध आणि मांस उत्पादनासाठी पाळली जाते. बीटल शेळी ही जमुनापारी शेळीपेक्षा आकाराने लहान असते. या.शेळीच्या नराचे वजन 50 ते 70 किलो आणि प्रौढ मादी शेळीचे वजन 40 ते 50 किलो दरम्यान असते  व या शेळीची सरासरी दूध उत्पादनक्षमता दीडशे किलोग्रॅम इतकी आहे.

5- सिरोही शेळी या जातीची शेळी राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाळतात. वर्षातून एकदाच पिल्लांना जन्म देणारी शेळीची ही जात असून जुळी पिल्ले देण्याचे प्रमाण सामान्य आहे.

साधारणपणे वयाच्या 19व्या महिन्यात ही गर्भधारणेत राहू शकते. या जातीच्या शेळीची सरासरी दूध उत्पादन 71 किलो आणि सरासरी स्तनपान कालावधी 175 दिवसांचा आहे.

6- ब्लॅक बंगाल शेळी भारतामध्ये शेळ्यांची ही जात सर्वात जास्त प्रमाणात पाळली जाते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एकाच वेळी दोन किंवा तीन तसेच कधीकधी चार पिल्लांना देखील जन्म देते. ब्लॅक बंगाल शेळीचे सरासरी दूध उत्पादन 53 किलो असून तिचा स्तनपानाचा कालावधी 90 ते 120 दिवसांचा आहे.

Ajay Patil