Crop Variety:- शेती क्षेत्रामध्ये भारतातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्था यांची अनन्यसाधारण आणि खूप महत्त्वाची अशी भूमिका असून शेती क्षेत्राच्या विकासाकरिता आवश्यक संशोधन तसेच विविध पिकांच्या वाण विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोलाची भूमिका या संस्थांची आहे.
तसेच शेतीसंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील विविध कृषी विद्यापीठांचा प्रयत्न असल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी याच प्रमाणे जर आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणांचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला असून या पाच वाणामध्ये विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना-16( बीडीएनजी 2018-16), सोयाबीनचा एमएयुएस-731, देसी कपाशीचा पीए 833, अमेरिकन कपाशीचा एनएच 677 आणि तिळाचा टीएलटी 10 या वाणांचा समावेश करण्यात आला आहे.
या राजपत्रात समावेश करण्यात आल्यामुळे आता या वानांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी याची खूप मदत होणार आहे.
राजपत्रात या वाणांचा समावेश करता यावा याकरिता केंद्रीय स्तरावर सचिवांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता व सचिव स्तरावर चाचण्या घेऊन दीड वर्षात या वानांना मान्यता घेऊन राजपत्रात समावेश केल्याच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
या वाणामधील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तिळाच्या वाणास महाराष्ट्र राज्यासाठी तर सोयाबीनच्या वाणास महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरिता मान्यता देण्यात आली असून यामध्ये देशी कपाशीच्या व्हरायटीला दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांकरिता लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.
काय आहेत या वाणांची वैशिष्ट्ये?
1- सोयाबीन एमएयुएस-731- हा वाण लागवडीनंतर परिपक्व होण्याकरिता 94 ते 98 दिवसाचा कालावधी घेतो. तसेच पाने निमपसरी, गोलाकार व मोठी असतात व शेंगाचे प्रमाण अधिक व गुच्छांमध्ये शेंगा लागतात.
तीन दाण्याच्या शेंगांचे प्रमाण जास्त असते व कोरडवाहू साठी अधिक उत्पादन देणारा वाण आहे. कीड व रोगास प्रतिकारक असून 100 ग्रॅम दाण्याचे वजन 13 ते 15 ग्राम भरते व उत्पादकता हेक्टरी 28 ते 32 क्विंटल पर्यंत आहे.
2- हरभरा चना 16( बीडीएनजी 2018-16)- महाराष्ट्रात हा वाण प्रसारित करण्यास मान्यता देण्यात आली असून यापासून सरासरीपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते.
लागवडीनंतर साधारणपणे 110 ते 115 दिवसात हरभऱ्याचा हा वाण परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून त्याचे दाणे टपोरे असतात व 100 दाण्याचे वजन 29 ग्रॅम भरते. विशेष म्हणजे यावर किडींचा प्रादुर्भाव कमीत कमी होतो.
3- देशी कपाशीचा पीए 833 वाण- याची उत्पादकता 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा 35 चे 36 टक्के आहे. धाग्याची लांबी 28 ते 29 मिलिमीटर असून लागवडीनंतर परिपक्व होण्याकरिता 150 ते 160 दिवसांचा कालावधी लागतो.
या वाणाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे सरळ धाग्याची लांबी व मजबुती तसेच रस शोषक किडी, कडा तसेच करपा व दहीया रोगास सहनशील आहे.
4- अमेरिकन कपाशीचा एनएच 677 वाण- हा वाण अमेरिकन कापसाचा वाण असून याची हेक्टरी उत्पादकता 14 ते 15 क्विंटल पर्यंत आहे व रुईचा उतारा 37 ते 38 टक्के आहे.
धाग्याची लांबी 25 ते 26 मिनिटे असून लागवडीनंतर 155 ते 160 दिवसात परिपक्व होतो. पाण्याचा ताण पडला तर त्याला सहनशील आहे व रस शोषक किडींना देखील सहनशील आहे.
5- तीळ पिकाचा टीएलटी 10 वाण- तिळ पिकाची ही व्हरायटी रब्बी तसेच खरीप व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य असून महाराष्ट्रासाठी लागवडीस शिफारस केलेली आहे. लागवडीनंतर याचा परिपक्वता कालावधी 90 ते 95 दिवसांचा असून उत्पादन सहा ते सात क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे.
यामध्ये तेलाचे प्रमाण 45 ते 77 टक्के असून तेल उत्पादनामध्ये सरस असलेला हा वाण आहे. तसेच तीळ पिकांवरील तुडतुडे तसेच पाने गुंडाळणारी अळी, बोंड आळी तसेच अल्टरनेरिया व भुरी रोगास प्रतिबंधक व सहनशील असा वाण आहे.