रणरणत्या उन्हातही बहरला गुलमोहर !

Ahmednagarlive24 office
Published:
Agricultural News

Agricultural News : हिंदू नववर्षाच्या आगमनाची सुरुवात ही संपूर्ण जीवसृष्टीत नवचैतन्य निर्माण करते. वैशाख महिन्यातील उन्हाळ्याचा कहर, तळपता सूर्य, वाढते तापमान, पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल वातावरणातही काही वृक्ष-वेली फुलल्या आहेत.

उन्हाळ्यातही वृक्षांचे वेगवेगळे अविष्कार पहावयास मिळत आहेत. काही वृक्ष पूर्ण निष्पर्ण होऊन सोशिकपणे पावसाळ्याची वाट पाहतात, तर काहींची चैत्र पालवी आता गडद हिरवी होते. सावली देण्याचे काम हे वृक्ष जबाबदारीने करतात.

काहींचा फळे उकलून बिया उधळण्याचा कार्यक्रम चालतो, तर गुलमोहरासारख्या वृक्षांना उन्हाळ्यात फुले येतात. ही निसर्गाची एक अदभूत किमया आहे. सध्या काँक्रीटच्या जंगलात सर्वत्र गुलमोहर बहरलेला दिसत आहे. रणरणत्या उन्हात आपले सौंदर्य टिकवून ठेवणारा वृक्ष म्हणजे गुलमोहर.

आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेकांना आकर्षित करतो. याला एप्रिल मे महिन्यात सुंदर लाल केशरी रंगाची फुले येतात. उन्हाळ्यात गुलमोहरासारखे भरभरून फुलणारे दुसरे झाड नाही. इतरवेळी उदासवाना उभा असलेला हा वृक्ष उन्हाळ्याची चाहूल लागताच इतका बदलून जातो की, तारुण्याने सळसळणाऱ्या गुलमोहराला त्याच्या लाल केशरी फुलां शिवाय त्याचे पानदेखील दिसत नाही.

घरापुढे फुललेला गुलमोहर घरावर पाखर घातल्यासारखा वाटतो. हा एका पायावर फुलांची रंगीत छत्री किंवा छत्र माणसांवर धरतो, मे- जून महिन्यात गुलमोहराला खरा बहर येतो. कधी कधी निसर्गात घडणाऱ्या काही मोहक गोष्टी सांगणारा,

जाणाऱ्याचे हसतमुखाने स्वागत करणारा, मनाचा हिंदोळा झुलवणारा हा गुलमोहर आपल्या फुलांच्या पायघड्या सर्वांसाठी घालत असतो. त्याच्या फुलांनी बहरलेल्या व संकटांना न घाबरता,

न खचता नेहमी हसत रहावे, हा संवेदनशीलतेचा कानमंत्र देणारा हा गुलमोहर सध्या चांगला बहरला आहे. पर्जन्यराजाच्या आगमनार्थ पहिल्या पावसा पर्यंत याची साथ टिकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe