कृषी

कोरफड शेती आणि नॅचरल ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून हा तरुण शेतकरी करत आहे वार्षिक 2 ते 3 कोटींची उलाढाल! वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

तरुणाई म्हटले म्हणजे सळसळता उत्साह, चिरंतर ऊर्जेची खाण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यावर तरुणांचा भर असतो. तरुण ज्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतात त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलतो हे आपल्याला दिसून येते.

गेल्या काही वर्षापासून अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरी नसल्यामुळे शेती क्षेत्राकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व यामध्ये काही तरुण-तरुणींना नोकरी असताना देखील त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय करियर म्हणून निवडल्याचे चित्र आहे. शेतीमध्ये येत असताना देखील पारंपारिक पद्धती व पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचा व स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची कामगिरी करताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण हरीश धनदेव या तरुण शेतकऱ्यांचा विचार केला तर याने जैसलमेर नगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाची नोकरी सोडून शेतीची वाट धरली व आज कोरफड लागवडीतून यशाचे शिखर सर केले आहे. याच तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण बघणार आहोत.

 कोरफड लागवडीतून कोट्यावधीची उलाढाल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान राज्यातील जैसलमेर येथील रहिवासी असलेले हरीश धनदेव या तरुणाने इंजिनिअरिंग पूर्ण करून जैसलमेर नगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर नोकरी मिळवली. परंतु मनामध्ये काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने नोकरी सोडली व शेतीमध्ये करिअर करण्याचे ठरवले.

शेती करण्याचे निश्चित झाल्यानंतर काय करावे या विचारात असताना कोरफड लागवड करण्याचा निर्धार केला व वाळवंट असलेल्या जमिनीमध्ये कोरफडीची लागवड केली व सुरुवात ही 2013 मध्ये केली व सुरुवातीला बिकानेर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पंचवीस हजार कोरफडीचे रोपे उपलब्ध केली

व त्याची लागवड दहा बिघे जमिनीमध्ये केली. हरीश यांच्याकडे एकूण 120 एकर जमीन आहे आजमीतिला हळूहळू कोरफड लागवडीत वाढ करून 120 एकर जमिनीत व्यावसायिक दृष्टिकोनातून कोरफडीची शेती सुरू केली आहे.

 हरीश धनदेव यांना किती मिळते उत्पन्न?

कोरफड लागवड केल्यानंतर अनेक विचार चक्र हरिश धनदेव यांच्या मनामध्ये होते. कोरफड लागवड केली तर मार्केट कसे असेल किंवा ही शेती कशी वाढवता येईल? इत्यादी प्रकारचे अनेक विचार मनात होते. या विचारात असतानाच कोरफड लागवडीला किंवा कोरफडच्या उत्पादनाला मदत होईल याकरिता त्यांनी जैसलमेर येथे नॅचरल ऍग्रो नावाची कंपनी सुरू केली.

आज या कंपनीच्या माध्यमातून ते पतंजली सारख्या नामांकित कंपनीला देखील कोरफडीचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे कोरफड लागवड व या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा हरीश यांना होत आहे.

इतकेच नाही तर हरीश धनदेव हे त्यांच्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या कोरफडीची निर्यात देखील करत असून त्यांना कोरफड विक्री आणि कंपनी अस दोघं मिळून एकूण वार्षिक टर्नओव्हर सध्या दोन ते तीन कोटींचा करत आहेत.

 कोरफड शेतीविषयी हरीश धनदेव काय सांगतात?

कोरफड शेती विषयी हरीश सांगतात की, कोरफड शेती करताना गुणवत्ता आणि दर्जेदार उत्पादन कसे निघेल यावर भर देणे गरजेचे आहे. आपण आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी कधीच देत नाहीत. त्यामुळे हरिश्चंद्र हे कोरफड शेतीच्या माध्यमातून आज कोटींची उलाढाल करणारे उद्योजक बनले असून लाखो तरुणांसाठी एक प्रेरणा देणारे देखील ठरले आहेत.

Ajay Patil