कृषी

श्रीकांत भाऊंनी केला ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर आणि एकरी मिळवले 152 टन उसाचे उत्पादन! वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

sugarcane Crop Management:- शेती क्षेत्रामध्ये जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीचे उत्पादन मिळवता येते व त्या माध्यमातून मिळणारा आर्थिक नफा देखील जास्त असतो.

शेतीमध्ये आता अनेक नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अनेक शेतकरी करू लागले आहेत व त्याचा नक्कीच फायदा शेतीमध्ये होताना दिसून येत आहे. योग्य व्यवस्थापनाच्या पद्धती आणि कौशल्य पूर्ण रीतीने केलेला तंत्रज्ञानाचा वापर फायद्याचा ठरत आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रामापूर येथील श्रीकांत गवळी या सुशिक्षित असलेल्या तरुण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी उत्तम असे व्यवस्थापन ठेवले व एका एकरमध्ये 152 टन असे विक्रमी उसाचे उत्पादन मिळवले आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघू.

श्रीकांत गवळी यांनी घेतले एका एकर मध्ये 152 टन उसाचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात असलेल्या रामापुर या गावातील प्रगतीशिल शेतकरी म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत सुरेश गवळी यांच्याकडे एकूण सात एकर जमीन आहे.

चांगले उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अगोदर ते भाजपाला पिकांची लागवड या शेतीमध्ये करत होते. परंतु त्यांनी भाजपाला शेती सोडली व 2019 मध्ये उसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी सात एकर उसाची लागवड केली. ऊस पिकाचा त्यांचा एक स्वतःचा अभ्यास तर आहेच

परंतु त्यामध्ये त्यांनी गन्ना मास्टर या तंत्रज्ञानाचा वापर केला व यामुळेच त्यांना एकरी 152 टन उसाचे उत्पादन मिळाले.त्यांनी ऊस लागवडीसाठी असणारी जी काही पारंपारिक पद्धत आहे त्यामध्ये अडीच किंवा साडेचार फूट इतके सरीचे अंतर असते. परंतु तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी तब्बल सरीमध्ये आठ फुटाचे अंतर ठेवले त्यामुळे सरासरी उत्पादनात वाढ झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

आज जरी त्यांनी एकरी 152 टन उसाचे उत्पादन घेतले असले तरी गेल्या आठ वर्षापासून त्या जमिनीतील मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न केले व त्यामध्ये हरभरा पिकाचा बेवड ठेवला. इतकेच नाही तर शेतामध्ये पिकांचे अवशेष तसेच पालापाचोळा न जाळता त्यांनी मातीमध्येच गाडून मातीतील जिवाणू जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले.

अशाप्रकारे केले सगळे व्यवस्थापन
श्रीकांत भाऊंनी ज्या शेतामध्ये 152 टन एकरी उसाचे उत्पादन घेतले त्या शेतामध्ये तयारी करताना त्यांनी अगोदर एकरी सहा ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर उभी आडवी नांगरणी केली व आठ फूट अंतरावर सरी पडली. त्यानंतर गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचे 86032 कोईमतुर बियाणे लागवडीसाठी वापरले व सव्वा फुटावर रोपांची लागवड केली.

तसेच या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणीचे नियोजन केले व विद्राव्य खते देखील वापरली.ऊस लागवड झाल्यानंतर साठाव्या दिवशी त्यांनी बाळभरणी केली व 90 व्या दिवशी पावर टिलरने हलकी भरणी दिली.

त्यानंतर लागवडीच्या 111 व्या दिवशी मोठी भरणी दिली. अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने त्यांना भरगोस असे ऊस उत्पादन मिळवता आले. विशेष म्हणजे एकही पाट पाण्याचा वापर न करता त्यांनी या उसाला ठिबक सिंचनाच्या साह्याने पाणी व्यवस्थापन केले व संपूर्ण प्लॉट ठिबकच्या साह्यानेच वाढवला.

गन्ना मास्टर तंत्रज्ञान नेमके काय आहे?
श्रीकांत गवळी यांनी जे काही उसाचे उत्पादन मिळवले त्यामागे गन्ना मास्टर तंत्रज्ञानाची मोठी मदत त्यांना झाली. हे तंत्रज्ञान ऊस अभ्यासक आणि प्रयोगशील ऊस उत्पादकांनी एकत्र येऊन सुरू केलेले आधुनिक ऊस उत्पादनाचे तंत्रज्ञान आहे.

या तंत्रज्ञानामध्ये ऊस पिकासाठी आवश्यक रासायनिक खते आणि पाण्याचा योग्य आणि आवश्यक वेळी वापर करण्यावर भर दिला जातो व त्या माध्यमातून उसाचे उत्पादन कसे वाढेल हे पाहिले जाते. ऊस पिकाच्या बाबतीतल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या शेतकऱ्यांना सांगता याव्या त्याकरिता त्यांची एक टीम देखील काम करते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil