शेती क्षेत्रासाठी पाणी हे अत्यावश्यक बाब असून पाण्याशिवाय शेतीमध्ये उत्पादन मिळवणे शक्यच नाही. त्यामुळे जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली किंवा पाण्याची टंचाई उद्भवली तर पिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या उपाययोजना करत असतात. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर किंवा पिकांना अच्छादन पद्धतीचा वापर करणे इत्यादी अनेक पर्याय अवलंबले जातात. तसेच संशोधकांच्या माध्यमातून देखील कमीत कमी पाण्यात किंवा दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे व त्यावर काम देखील केले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून जर आपण हायड्रोजेल नावाच्या गोळीचा किंवा हायड्रोजेल विषयी माहिती घेतली तर ही गोळी शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. कमीत कमी पाण्यामध्ये देखील चांगले उत्पादन मिळवण्यात शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे.
हायड्रोजल नेमके काय आहे व कसे काम करते?
हायड्रोजलमुळे पिकांच्या चारही बाजूला पाणी साठवण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाते. पावसाळ्यामध्ये किंवा इतर केव्हाही पाऊस पडला तर हायड्रोजेल हे त्याच्या आकारमानाच्या सुमारे दोनशे ते आठशे पट जास्तीचे पाणी धरून ठेवते ज्यामुळे फळबागायतदार शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
हायड्रोजेल हे अशा पद्धतीने पाणी साठवून ठेवते व नंतर जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण झाली तर पिकांना ते पाणी वापरण्यास सोपे होते. एका हेक्टर करता चार किलो हायड्रोजल पुरेसे ठरते. तसेच यामुळे सिंचनाच्या वेळेस होणारा पाण्याचा अपव्यय देखील थांबवता येणार आहे.
शेतीमध्ये दुष्काळाचा प्रभाव कमी करणे तसेच खतांची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने देखील हायड्रोजेल वापराच्या संशोधनाला मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या या संबंधीचा प्रकल्प हा राष्ट्रीय हिमालयीन मिशन अंतर्गत त्रिपुराच्या केंद्रीय विद्यापीठाने सुरू केला आहे. यामध्ये शास्त्रज्ञांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, हायड्रोजेलच्या माध्यमातून विहित प्रमाणात पाण्याचे वितरण केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे पातळी 50 ते 70% पर्यंत टिकून राहते.
हायड्रोजल कसे काम करते?
हे एक प्रकारचे पॉलिमर असून तो साखळीसारखा असतो व त्यामध्ये पाणी जमा होते. जेव्हा पिकांना पाण्याची आवश्यकता भासते तेव्हा ते हळूहळू पाणी सोडते. यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया होत नाही.
याबाबत संशोधक म्हणतात की, हायड्रोजेल मुळे पिकांच्या मुळांभोवती सतत पाणी असते व त्यामुळे शेतीतील उत्पादन तर वाढते व त्याशिवाय फुले, फळांचे गुणवत्ता देखील वाढण्यास मदत होते. तसेच दुष्काळी परिस्थितीत शेती पिकांचे संरक्षण होते.
एकदा वापर केला तर एक वर्षापर्यंत करते काम
याबाबत संशोधक म्हणतात की, हायड्रोजन हे सेल्युलोज पासून बनलेले असते व ते सूर्यप्रकाशात नष्ट होते. त्यामुळे पर्यावरणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. ते सहजपणे पाणी शोषून घेते व पुन्हा पाणी सोडते. विशेष म्हणजे हायड्रोजेल 35 ते 40°c तापमानामध्ये प्रभावीपणे काम करण्यास सक्षम असते.
वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाणी भरण्याची किंवा पाणी साठवण्याची किंवा फुगण्याची क्षमता ही त्याच्या कोरड्या वजनापेक्षा तब्बल चारशे पट अधिक आहे त्यामुळेच ते तितक्या क्षमतेने पुन्हा पाणी पिकांना उपलब्ध करून देऊ शकते. याचाच अर्थ केवळ चार किलो हायड्रोजेलचा वापर एक हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. या हायड्रोजेलच्या गोळ्या आठ महिने ते एक वर्षापर्यंत उत्तमपणे काम करू शकतात.