Wheat Farming : गहू हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात या पिकाची कमी अधिक प्रमाणात पेरणी होते. गहू हे एक रब्बी हंगामातील प्रमुख बागायती पीक आहे. गव्हाची पेरणी ही नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर महिन्यात होते.
दरम्यान, गव्हाच्या पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर योग्य खतांची मात्रा पिकाला देणे आवश्यक आहे. गव्हाच्या पिकाला झिंक आणि सल्फर या दोन खतांची देखील आवश्यकता असते. या दोन्ही खतामुळे पिकाची चांगली वाढ होते आणि उत्पादन देखील चांगले मिळते. पण जर गव्हाच्या पिकाला फक्त झिंक दिले आणि सल्फर दिले नाही तर पिकाला याचा फारसा फायदा होत नाही. यामुळे ही दोन्ही खते सोबत देणे आवश्यक आहे.
दरम्यान आज आपण ही दोन्ही खते सोबत का दिली पाहिजेत याविषयी तज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. झिंक कधीच सल्फरशिवाय बनत नाही, जेव्हाही तुम्ही बाजारात कोणतेही झिंक उत्पादन पाहाल तेव्हा त्यात नेहमी सल्फर असते. याचे मुख्य कारण म्हणजे सल्फरमुळे तुमच्या मातीची pH पातळी कमी होते. यामुळे तुमच्या झाडांना झिंक पूर्णपणे उपलब्ध होते.
कारण जास्त पीएच असलेल्या मातीत झिंक कमी प्रमाणात मिळते. आणि पिकाची वाढ चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना झिंकचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा झिंक टाकूनही शेतातील झिंकची कमतरता दूर होत नाही. यामुळे जेव्हा तुम्ही पिकाला जिंक द्याल तेव्हा त्यासोबत 3 किलो पावडर किंवा 10 किलो दाणेदार सल्फर वापरले पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. जेणेकरून पिकाला झिंकचे पूर्ण फायदे मिळू शकतील.
झिंकमुळे झाडाचा हिरवा भाग वाढतो आणि सल्फरमुळे वनस्पतीतील प्रथिनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पिकावर चांगले परिणाम पाहायला मिळतात. जर तुमच्या मातीची ph पातळी बरोबर असेल तर तुम्ही सल्फरशिवाय झिंक वापरू शकता. पण जर तुमच्या मातीतील पीएच हे जास्त असेल तर तुम्हाला निश्चितच झिंक आणि सल्फर सोबत वापरावे लागणार आहे.