Wheat Crop Variety:- रब्बी हंगामातील जर प्रमुख पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर गहू हे पीक संपूर्ण भारतात रब्बी हंगामासाठी ओळखले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये रब्बी हंगामात गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
सध्याचा जर आपण कालावधी बघितला तर हा गहू पेरणीचा कालावधी असून यामध्ये जिरायत क्षेत्र किंवा बागायत त्यानुसार पेरणीचा कालावधी ठरवणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर गव्हाची जिरायती पेरणी करायची असेल तर ती साधारणपणे 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून घेणे गरजेचे असते.
थोडेफार पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर साधारणपणे 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करून घ्यावी व पाण्याची व्यवस्था असेल म्हणजेच बागायती क्षेत्र असेल तर एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत गव्हाची पेरणी पूर्ण करावी.
तसेच बागायती क्षेत्रासाठी उशिरा पेरणी करायची असेल तर जास्तीत जास्त 15 डिसेंबर पर्यंत पेरणी करता येते. त्यामुळे या सिंचन सुविधेनुसार गव्हाची पेरणी करताना मात्र योग्य वाणांची निवड करणे देखील तितकेच गरजेचे ठरते.
कारण आपण जर गव्हाचे वाण पाहिले तर प्रत्येकाचे गुण वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्यामुळे योग्य वाणांची निवड ही भरघोस उत्पादनाची पहिली पायरी असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या लेखात आपण बागायती क्षेत्रासाठी वेळेवर पेरणी करायची असेल तर कोणते वाण फायद्याचे ठरतील याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
बागायती वेळेवर पेरणीसाठी भरघोस उत्पादन देऊ शकणारे वाण
1- फुले समाधान( एनआयएडब्ल्यू 1994)- बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारसीत सरबती वाण असून गहू पिकावरील तांबेरा रोगास व मावा किडीस प्रतिकारक्षम असा वाण आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फुले समाधान या वाणाचे दाणे हे आकाराने टपोरे व दिसायला खूप आकर्षक असतात.
या गव्हाची चपाती अतिशय उत्कृष्ट व इतर वाणांपेक्षा सरस दिसून येते. बागायती क्षेत्रामध्ये जर वेळेवर पेरणी केली तर पेरणीनंतर साधारणपणे 115 दिवसात पक्व होतो व उशिरा पेरणी केली तर 110 दिवस लागतात.
येणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर बागायतीसाठी वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी 40 ते 50 क्विंटल व उशिरा पेरणीसाठी हेक्टरी 42 ते 45 क्विंटल उत्पादन मिळते.
2- त्र्यंबक( एनआयएडब्ल्यू 301)- महाराष्ट्रासाठी वेळेवर बागायती पेरणी करिता शिफारस करण्यात आलेला सरबती वान असून याचे दाणे मध्यम टपोरे असतात व हा वाण देखील तांबेरा रोगाला प्रतिकारक आहे.
या गव्हाची चपाती देखील चवीने उत्तम व दर्जेदार असते. पेरणीनंतर साधारणपणे 115 दिवसात पक्व होतो व मिळणारे उत्पादन हे हेक्टरी 40 ते 45 क्विंटल असते.
3- तपोवन( एनआयएडब्ल्यू 917)- बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारसित असा सरबती वाण असून याचे दाणे मध्यम टपोरे असतात व हा देखील तांबेरा रोगाला प्रतिकारक असा गव्हाचा उत्कृष्ट वान आहे.
चपातीसाठी उत्तम असून पेरणी पासून साधारणपणे 115 दिवसांनी पक्व होतो. तपोवन या गव्हाच्या वाणाचे हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
4- गोदावरी( एनआयडीडब्ल्यू 295)- बागायती वेळेवर पेरणी करिता शिफारशीत वाण असून याचे दाणे टपोरे, आकर्षक व चमकदार असतात व तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम असा वाण आहे.
शेवया व कुरड्या बनवण्यासाठी हा वाण उत्तम असून पेरणीनंतर साधारणपणे 110 ते 115 दिवसांमध्ये पक्व होतो. गोदावरी वाणाचे हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते.