Farmer Success Story:- पारंपारिक शेती पद्धत आणि पारंपारिक पिके आता काळाच्या ओघात मागे पडले असून त्या जागी आता शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला असून मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला पिके तसेच फळ पिकांच्या लागवडीतून शेतकरी आता लाखोंचे उत्पन्न मिळवताना दिसून येत आहे.
कारण तंत्रज्ञानाचा वापर हा शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरताना दिसून येत आहे. तसेच आता बरेच शेतकरी फळबाग लागवडीतून दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेत असून त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील अकोला पालवेवाडी येथील शेतकरी संतोष पालवे यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी सेंद्रिय शेतीतून चांगला प्रकारे फळबागाचे नियोजन करून आंब्याचे दर्जेदार उत्पादन घेतले व यातून उत्पादन घेतलेल्या दहा टन केशर आंब्याची अमेरिकेमध्ये निर्यात केली आहे.
तेराशे आंब्याच्या झाडांमधून मिळाले20 लाख रुपयांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील अकोला पालवेवाडी यातील शेतकरी संतोष शेषराव पालवे यांनी सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवड केली व या जोरावर लाखोंचे उत्पन्न मिळवलेले आहे. तसे पाहायला गेले तर नगर जिल्ह्यातील अकोला तालुका हा ऊस तोडणी कामगारांचा तालुका किंवा गाव म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी असलेले दुर्गम आणि डोंगराळ भाग व सतत दुष्काळाची स्थिती त्यामुळे शेतीची परिस्थिती देखील काहीशी चांगली नाही. परंतु तरीदेखील या परिस्थितीवर मात करत पालवेवाडी येथील शेषराव पालवे यांनी दहा वर्षांपूर्वी नापिक तसेच हलक्या अशा साडेआठ एकर जमिनीवर फळबागांची लागवड केली व यामध्ये गावरान, केशर तसेच हापूस,
लंगडा,राजापुरी,वनराज,सदाबहार,आम्रपाली, तोतापुरी अशा विविध प्रकारच्या तेराशे आंब्यांची झाडे लावली व शेततळे उभारून या फळबागासाठी पाण्याचे नियोजन केले. सर्व साडेआठ एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन केलेले आहे. जेव्हा कोरोना कालावधीमध्ये प्रत्येक क्षेत्राला आर्थिक दृष्टिकोनातून फटका बसलेला होता परंतु या कालावधीत देखील पालवे कुटुंबाची खरी ओळख या कालावधीत संपूर्ण तालुक्याला झाली.
पालवे हे मोठ्या प्रमाणावर पिकलेले आंबे देखील विक्रीकरिता बाजारात दाखल होतात. आंबे पिकवण्यासाठी ते बारदान तसेच वृत्तपत्रांची रद्दी व गवताचा वापर करतात व या साह्याने ते मोठ्या हॉलमध्ये नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याकरिता अढी लावतात. यामध्ये वेगवेगळे विभाग केले जातात व या माध्यमातून पिकलेले आंबे विक्रीसाठी बाजारात पाठवले जातात.
विशेष म्हणजे पालवे कुटुंब सकाळी पाच वाजता उठूनच शेतामध्ये कामाला लागतात. यावर्षी त्यांनी पिकवलेला दर्जेदार व निर्यातक्षम असा दहा टन केशर आंबा अमेरिकेला निर्यात केला असून छत्रपती संभाजीनगर येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने त्यांनी वीस लाख रुपयांचा दहा टन केशर आंबा निर्यात केला आहे.
सध्या त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 1000 आंब्यांची झाडे तसेच मोसंबीची सातशे, नारळाची 200 तसेच दीडशे झाडे जांभळाची लावलेली आहेत. यावर्षी सगळीकडे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे पाण्याची कमतरता त्यांना जाणवत होती व त्याकरिता त्यांनी टँकरच्या माध्यमातून विकत पाणी घेऊन झाडांचे संगोपन केले. म्हणजे त्यांचे जर आंब्याचे उत्पादन बघितले तर एका झाडापासून साधारणपणे ते 800 आंब्यांची उत्पादन घेतात.
आता स्वतः निर्यातदार होण्यासाठी करत आहेत प्रयत्न
तसे पाहायला गेले तर फळबागाच्या संबंधित असलेले सर्व कामे ते कुटुंबातील सदस्य मिळुन करतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा ते कामांसाठी मजुर देखील लावतात. जोपर्यंत दोन महिन्याचा आंब्यांचा हंगाम सुरू असतो तोपर्यंत त्यांची पूर्ण कुटुंबाची धावपळ असते. परंतु काहीतरी वेगळे करण्याची तयारी ठेवत या कुटुंबाने मोठ्या प्रयत्न करून आणि धाडसाने फळबाग लावण्याचा निर्णय घेतला आहे व आता बाजारपेठेचा अभ्यास करत ते स्वतः निर्यातदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.