Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची लागवडीमुळे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर शेतीत क्रांती घडवून येत असल्याचे चित्र आहे. तसेच पारंपारिक पिकांना फाटा देत आताचे शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग शेतीमध्ये करत असून शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेच्या जोरावर अनेक पिकांची लागवड राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता शक्य झालेली आहे.
याबाबत जर आपण सफरचंदाचा विचार केला तर हे पीक प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर भारतात येणारे प्रमुख पीक आहे. सफरचंदाचे उत्पादन येण्याकरिता थंड हवामानाची आवश्यकता असते व म्हणूनच हिमाचल व काश्मीरसारख्या थंड प्रदेशामध्ये सफरचंदाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते
परंतु आपण गेल्या एक ते दोन वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रासारख्या उष्ण तापमान असलेल्या प्रदेशात देखील बऱ्याच ठिकाणी सफरचंदाची लागवड शेतकऱ्यांनी यशस्वी केल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल. अगदी याच पद्धतीने द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात देखील एका शेतकऱ्याने सफरचंदाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याने सफरचंदाची लागवड केली यशस्वी
नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ते द्राक्ष आणि कांदा ही पिके होय. राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये द्राक्षाचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते व त्यातल्या त्यात निफाड तालुक्यामध्ये द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
परंतु जर गेल्या काही वर्षांचा विचार केला तर नैसर्गिक अवकृपेमुळे अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतो व हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जातो. दरवर्षी हे संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले असल्याचे सध्या आपल्याला दिसून येते.
त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी देखील आता द्राक्ष या पिकाऐवजी काहीतरी वेगळ्या पिकांचा प्रयोग शेतीमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
याच प्रयत्नातून निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड या गावचे शेतकरी भरत बोलीज यांनी वेगळ्या पिकाची लागवड करण्याच्या उद्देशाने सफरचंदाची लागवड केली व आज त्यांच्या या सफरचंदाच्या झाडांना फळे लगडल्याचे दिसून येत आहे.
अशा पद्धतीने घेतला सफरचंद लागवडीचा निर्णय
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पालखेड येथील निवासी असलेले साहेबराव बोलीज यांचे भरत बोलीज हे चिरंजीव असून ते सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. परंतु कोरोना कालावधीमध्ये त्यांची नोकरी गेली व त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला की आता काय करावे?
वडिलोपार्जित घरची शेती आहे परंतु नैसर्गिक परिस्थितीचा कायमच तडाखा बसत असल्यामुळे द्राक्ष बागेचे कायमच नुकसान होते व लाखोंचा खर्च वाया जातो ही परिस्थिती त्यांच्यासमोर होती. म्हणून द्राक्षबागा व्यतिरिक्त काहीतरी वेगळ्या पिकाचा प्रयोग करावा अशी मनात त्यांची इच्छा झाली. त्यानंतर मात्र त्यांनी त्याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली.
याकरिता हिमालयीन शिमला ॲना या जातीच्या सफरचंदाची 30 झाडे खरेदी केली व मार्च 2023 मध्ये त्यांची लागवड केली. तीस झाडांना त्यांना आतापर्यंत एका झाडासाठी शंभर रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये इतका खर्च आलेला आहे.
योग्य माहिती आणि व्यवस्थापनाने त्यांचा हा सफरचंद लागवडीचा प्रयोग आता यशस्वी झाला असून त्यांच्या शेतातल्या सफरचंदाच्या झाडांवर आता फळे आलेली आहेत.
या सफरचंदाची काढणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये सुरू होणार असल्यामुळे जम्मू-काश्मीर राज्यातील सफरचंद बाजारात दाखल होण्याअगोदरच त्यांचे सफरचंद बाजारात येतील अशी अपेक्षा त्यांना आहे. हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सफरचंदाच्या लागवडीत वाढ करण्याचा विचार त्यांचा आहे.