कृषी

गव्हाची पेरणी करायला उशीर झाला? ‘या’ पद्धतीने करा नियोजन अन बिनधास्त करा उशिरा पेरणी! अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन ठरेल फायद्याचे

Published by
Ajay Patil

Wheat Crop Management:- रब्बी हंगामाला आता सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांच्या लागवडीसाठी तयारी करण्यात येत असून काही पिकांची पेरणी किंवा लागवड पूर्ण झाल्याचे सध्या चित्र आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये मका, गहू तसेच हरभरा इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्या खालोखाल कांदा पिकाची लागवड देखील होत असते.

परंतु गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. साधारणपणे गव्हाची लागवड करण्याचा जो काही कालावधी होता तो आता निघून गेलेला आहे. परंतु काही कारणामुळे जर गव्हाची पेरणी उशिरा झाली असेल व गहू लागवड करायची असेल तर मात्र काही गोष्टींचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

यामध्ये उशिरा पेरणी करायची असेल तर उशिरा गव्हाच्या लागवडीसाठी शिफारस केलेल्या वाणाची लागवड खूप महत्त्वाचे ठरते. तसेच जमिनीची पूर्व मशागत व उशिरा पेरणीचा कालावधी हा देखील यामध्ये महत्त्वाचा ठरतो.

लागवड केल्यानंतर मात्र पाणी व्यवस्थापनाचे नियोजन हे अपेक्षित उत्पादन मिळवण्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे आपण या अनुषंगाने उशिरा गहू लागवड करायची असेल तर कसे नियोजन ठेवावे? त्याबद्दलची माहिती घेऊ.

उशिरा गव्हाची पेरणी करायची तर या गोष्टींची काळजी घ्या

1- जमिनीची निवड- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गव्हाची पेरणी उशिरा करायची असेल तर जमिनीची निवड खूप महत्त्वाची ठरते व जमिनीची निवड करताना ती जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी व तसेच भारी व खोल जमिनीची निवड करावी. जमीन जर हलक्या स्वरूपाची असेल तर मात्र गव्हाची लागवड करणे टाळावे.

2- पूर्व मशागत कशी कराल?- खरीप हंगामातील जे काही पीक तुम्ही काढले असेल त्यानंतर जमीन साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी व कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन निघालेले ढेकुळ फोडून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी.

3- उशिरा म्हणजे केव्हा कराल पेरणी?- उशिरा बागायती गव्हाची पेरणी करायची असेल तर साधारणपणे तुम्ही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे आहे. हा कालावधी उलटून गेल्यानंतर मात्र गव्हाची पेरणी करूच नये.

4- किती बियाणे वापरावे?- उशिरा पेरणी करिता गव्हाचे एकरी 50 किलो बियाणे वापरणे फायद्याचे ठरते.

5- बियाण्याला बीजप्रक्रिया करून घेणे गरजेचे- गव्हाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला थायरम( 75 टक्के डब्ल्यूएस) या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी. तसेच मावा, तुडतुडे व खोडमाशी इत्यादी रसशोषक किडींच्या नियंत्रणाकरिता थायमेथोक्साम( 70 डब्ल्यूपी) 17.5 मिली प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.

जेव्हा तुम्ही बुरशीनाशकांच्या सहाय्याने बीज प्रक्रिया कराल त्यानंतर ते बियाणे सावलीत वाळवून नंतर त्यावर ऍझोटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू खतांची प्रत्येकी 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी. जिवाणू खतांची जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर उत्पादनामध्ये हेक्टरी दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होऊ शकते.

पाणी व्यवस्थापन ठरेल महत्त्वाचे
गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलित करून घ्यावे व जमिनीचा पोत पाहून 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाणी व्यवस्थापन करावे. साधारणपणे मध्यम ते भारी जमीन असेल तर गव्हाच्या पिकाकरिता चार ते पाच वेळा तुम्हाला पाणी देणे गरजेचे आहे.

या आहेत गहू पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था
मुकुट आणि मुळे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे पेरणीनंतरच्या 18 ते 20 दिवसानंतर, कांडी धरण्याची अवस्था ही पेरणीनंतर 45 ते 50 दिवस, फुलोरा अवस्था ही पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी,

गव्हाच्या दाण्यात दुधाळ चीक अवस्था ही पेरणीनंतर 80 ते 85 दिवस आणि दाने भरण्याची अवस्था ही पेरणी नंतर 90 ते 100 दिवस अशा पद्धतीचे असते व या कालावधीत व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे.

गव्हाला पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर कसे कराल पाण्याचे नियोजन?

1- तुमच्याकडे फक्त गव्हाला एकच पाणी देता येईल इतकेच पाणी असेल तर ते 40 ते 42 दिवसांनी द्यावे.

2- तर तुम्हाला दोन पाणी देणे शक्य असेल तर पिकाला पहिले पाणी गहू पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे 60 ते 65 दिवसांनी देण्याचे नियोजन करावे.

3- तुमच्याकडे जर गव्हाला तीन पाणी देणे शक्य असेल व तेवढा पाण्याचा साठा असेल तर तुम्ही पहिले पाणी लागवडीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरी पाण्याची पाळी 40 ते 42 व तिसरी 60 ते 65 दिवसांनी द्यावी.

Ajay Patil