Onion News : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातशुल्क लागू केल्याने नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच केंद्राच्या या निर्यात धोरणाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मात्र समर्थन केले आहे.
राज्यांतर्गत मागणीसाठी कांदा कमी प्रमाणात पुरतोय, म्हणून कदाचित केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शेतकरी आणि घेणारा या दोघांचा विचार करण्यात आला आहे. भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. हे निर्यातशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. यामुळे नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, अनेक भागांत आंदोलने करण्यात येत आहेत.
यावर स्पष्टीकरण देताना ना. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, तुम्ही कांदा इतर राज्यांत विकू शकता. ज्यावेळी शेतकरी अडचणीत होते, त्यावेळी नाफेडने कांदा खरेदी केला. भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणून हा निर्णय घेतला आहे.
आपल्या देशातील नागरिकांची काळजी आधी घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात जर कांद्याला मागणी असेल तर भावावर परिणाम होणार नाही. तरी देखील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे विनंतीचे पत्र मी मंत्री पियूष गोयल यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.