Kiwi Fruit Farming:- कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असाल तर याचा खूप मोठा फायदा आपल्याला मिळतो. त्याच पद्धतीने प्रयोगशीलता हा गुण शेतीमध्ये देखील खूप फायद्याचा ठरताना आपल्याला दिसून येतो.
आपण असे अनेक शेतकरी बघतो किंवा अनेक शेतकऱ्यांबद्दल ऐकले असेल की,ते त्यांच्या शेतामध्ये अनेक प्रकारच्या पिकांचे प्रयोग करत असतात व असे प्रयोग करत असताना ते खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात.
आजकालच्या शेती क्षेत्रामध्ये फळबागांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कल वाढला असून पळशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते व अशा प्रयत्नामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत आहेत.
अगदी या अनुषंगाने जर आपण हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर आता या ठिकाणचे शेतकरी देखील वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिकांची लागवडीतून लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.
उदाहरणच घ्यायचे तर या ठिकाणचे शेतकरी आता वाटाण्यापासून टोमॅटो तसेच शिमला मिरची,लसुन यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तसेच हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पछड या भागातील शेतकरी बघितले तर ते मोठ्या प्रमाणावर किवी या फळाची लागवड करत असून वर्षात लाखो रुपयांचे उत्पन्न किवी फळ शेतीतून मिळवत आहेत.
याच परिसरातील थलेडी या गावचे रहिवासी असलेले प्रगतिशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकुर यांची यशोगाथा बघितली तर यांनी देखील किवी लागवडीतून आज आर्थिक समृद्धी मिळवली आहे. ठाकूर यांनी साधारणपणे 1990 च्या दशकात किवी फळ शेती सुरू केली व त्यामध्ये हळूहळू वाढ करत आजतागायत किवी फळ शेती करत आहेत.
विजेंद्र सिंह ठाकुर किवी फळ शेतीतून मिळवतात दहा ते पंधरा लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमाचल प्रदेश राज्यातील थलेडी या गावचे प्रयोगशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकुर त्यांनी 1990 च्या दशकात एलिसन आणि हेवर्ड जातीच्या किवी फळाचे शंभर रोपे आणली व किवी शेती करायला सुरुवात केली.
त्यानंतर चार वर्षांनी आणखी पन्नास रोपांची त्यांनी लागवड केली. अशा पद्धतीने त्यांनी किवी फळ शेती आत्तापर्यंत सुरू ठेवलेली आहे. यावर्षी त्यांनी 50 क्विंटल कीवी चे उत्पादन घेतले व त्यातून दहा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.
1993 मध्ये सरकारी योजनेचा लाभ घेऊन वाढवली किवी फळाची शेती
विजेंद्र सिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शंभर रोपांची लागवड करण्यासाठी राज्य सरकारकडून एक लाख सहा हजार रुपयांचे अनुदान मिळाले व तेथून त्यांनी किवी शेतीमध्ये वाढ करायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण सहा सदस्य असून ते संपूर्ण कुटुंब आज शेती व्यवसायाशी निगडित आहे.
तसेच त्यांच्यासोबत दोन मजूर देखील त्यांनी ठेवले असून किवी सोबतच ते शेतामध्ये टोमॅटो तसेच शिमला मिरची, लसणासारखे इतर नगदी पिके देखील घेतात. तसेच विजेंद्रसिंह ठाकूर यांच्यासारखेच प्रगतिशील शेतकरी नरेंद्र पवार हे आहेत.
त्यांनी 1993 मध्ये कीवीची शेती सुरू केली व याकरिता त्यांनी नौनी येथील डॉ. वाय.एस.परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठातून 150 किवी फळाची रोपे विकत घेतली आणि विद्यापीठाकडून किवी फळशेतीचे बारकावे शिकून मग लागवड केली.
सध्या नरेंद्र पवार यांच्या शेतामध्ये तीनशे किवीची झाडे आहेत व यावर्षी त्यांना 90 क्विंटल फळांचे उत्पादन मिळाले असून त्यातून त्यांना 15 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
सध्या जर आपण विजेंद्र सिंह पवार यांच्या परिसरामध्ये किवी लागवड बघितले तर ती साधारणपणे 16 हेक्टर मध्ये केली जात आहे व त्यातून 133 मॅट्रिक टन उत्पादन मिळत आहे.
कीवी फळाच्या लोकप्रिय जाती बघितल्या तर यामध्ये एलिसन, ब्रूनो, मॉन्टी, हेवर्ड यासारख्या जातींचा समावेश आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून किवी हे फळ खूप महत्त्वाचे असून रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आणि ॲनिमिया यासारखे आजाराशी लढण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे बाजारपेठेत देखील या फळाला चांगली मागणी असते.