New Rate Of Land Measurement:- जमिनीच्या बाबतीत बऱ्याचदा हद्दीसंबंधी म्हणजेच बांध कोरणे किंवा एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण इत्यादी बाबतीत वाद उद्भवतात. हे वाद कधी कधी इतक्या टोकाला जातात की प्रकरणे अक्षरशा कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात वर्षानुवर्ष निकालाची वाट पाहण्यातच वेळ जातो व पैसा आणि वेळ देखील खर्च होतो.
या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून अशा प्रकारची जर काही समस्या आली तर सरकारी जमीन मोजणी आणली जाते व जमीन मोजणी करून हद्द निश्चिती केली जाते. साहजिकच या सगळ्या प्रक्रियेसाठी काही शुल्क सरकारकडून आकारले जाते व ते देणे गरजेचे असते.
यासंबंधी जर आपण नवीन अपडेट बघितली तर राज्य सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कामध्ये आता वाढ केलेली आहे व इतकेच नाही तर ही करण्यात आलेली वाढ एक डिसेंबर पासून राज्यात लागू देखील करण्यात आलेली आहे. यासोबतच जमीन मोजणीच्या प्रकारामध्ये देखील आता बदल करण्यात आले आहेत.
आता चार नाही तर दोन प्रकारात होईल जमिनीची मोजणी
अगोदर जर आपण बघितले तर जमीन मोजणीचे साधी जमीन मोजणी, तातडीची जमीन मोजणी, अतितातडीची जमीन मोजणी व अति अतितातडीची जमीन मोजणी अशा चार प्रकारांमध्ये जमीन मोजणी केली जात होती.
परंतु आता सरकारने यामध्ये बदल केला असून यामध्ये केवळ नियमित आणि द्रूतगती अशा दोनच प्रकारांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे व त्यानुसारच आता शुल्क आकारणी देखील होणार आहे.
तसेच जमीन मोजणी मध्ये महापालिका-पालिका हद्द व ग्रामीण हद्द असे दोन प्रकार ठेवण्यात आलेले असून त्यानुसार शेतजमीन व भूखंड या दोन्हीच्या मोजणी शुल्कामध्ये मात्र वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये आता नियमित मोजणी करताना 90 दिवसांचा तर द्रूतगती मोजणी करिता तीस दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
आता किती आकारले जाईल जमीन मोजणीसाठी शुल्क?
अगोदर जर बघितले तर यामध्ये प्रकारानुसार जमीन मोजणीकरिता शुल्क आकारणी बघितली तर साधी मोजणी करिता प्रति दोन हेक्टर 1000 रुपये, तातडीची जमीन मोजणी करिता दोन हजार रुपये, अति तातडीच्या जमीन मोजणी करिता 3000 आणि अति अतितातडीच्या जमीन मोजणी करिता 4000 असे दर आकारले जात होते.
परंतु आता नवीन बदलानुसार बघितले तर शेत जमिनीसाठी नियमित मोजणी 2000 आणि द्रूतगती मोजणी करीता आठ हजार रुपये आकारले जाणारा असून जमीन जर दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर नियमित मोजणीकरिता 1000 रुपये व द्रूतगतीसाठी चार हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहे.
तसेच व्यावसायिक भूखंड असेल तर त्याकरिता नियमित मोजणीकरिता तीन हजार रुपये तर द्रुतगती करिता बारा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
महापालिका आणि नगरपालिका हद्दीसाठी नियमित जमीन मोजणी दर तीन हजार रुपये तर द्रुतगतीसाठी 12,000 प्रति हेक्टर तर एक हेक्टर मर्यादेपुढे जमिनीसाठी नियमित मोजणी करिता पंधराशे रुपये तर द्रुतगती मोजणी करिता 6000 रुपये आकारले जाणार आहेत.
शहरी भागामध्ये यापूर्वीचा दर हा दहा गुंठ्यांसाठी लागू होता व त्यामध्ये आता बदल करत तो प्रतिहेक्टर असा करण्यात आला आहे. त्या तुलनेत मात्र शहरातील मोजणी शुल्क कमी झाले असून ग्रामीण भागात मात्र वाढल्याचे दिसून येत आहे.
तसेच निमताना मोजणी करायची असेल तर मात्र प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी शुल्काच्या तीन पट दराने शुल्क आकारले जाणार आहे. गुंठेवारीसाठी ग्रामीण भागात दीडपट तर महापालिका व पालिका हद्दीत दीडपट शुल्क आता आकारले जाणार आहे.