Land Measurement:- जमिनी विषयी दोन शेतकऱ्यांमध्ये किंवा दोन भावा भावांमध्ये देखील अनेक मुद्द्याला धरून वाद होतात. यामध्ये शेती रस्ता, शेतीच्या बांधावरून,एखाद्याच्या शेतामध्ये अतिक्रमण इत्यादी मुद्द्यांना धरून बऱ्याचदा वाद उद्भवतात व कधी कधी हे वाद कोर्टाच्या दारात देखील जातात. यामध्ये जर आपण जमिनीची हद्द किंवा बांध कोरणे याबाबत जर काही वाद असेल तर मात्र जमिनीची मोजणी हा त्याच्यावर एक उत्तम पर्याय असतो.
तुमच्या जमिनीच्या नकाशावर किंवा सातबारा उताऱ्यावर जेवढी जमीन आहे हे तुम्हाला जमिनीची मोजणी करूनच सिद्ध करता येऊ शकते. तुमच्या जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केले असेल किंवा हद्दीचा काही वाद असेल तर तुमची जमिनीची हद्द मोजणीच्या माध्यमातून तुम्हाला कळते. म्हणून आपण या लेखात जमिनीची मोजणी आणि त्यासंबंधीची इतर महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
सगळ्यात आधी पाहू जमीन मोजण्यासाठी लागणारी कागदपत्रे
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टॅम्प, गाव नमुना सातबारा चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा, मोजणीसाठीचे शुल्क भरण्याबाबतचे चलन, ज्या जमिनीची मोजणी करायची आहे तिचा अंदाजे नकाशा किंवा जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार कोणत्या बाजूची हद्दीत काय बदल करून पाहिजे याचा तपशील, शेजारील खातेदारांची नावे व पत्ते,9/3,9/4 चा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा?
1- याकरिता तुम्हाला जो काही अर्ज आवश्यक असतो त्याचा नमुना तुम्हाला सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळतो.
2- या अर्जाचे शीर्षक मोजणीसाठी अर्ज अशा पद्धतीचे असते. या अर्जामध्ये सुरुवातीला तुम्हाला ज्या तालुक्यातील कार्यालयामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे त्या तालुक्याचं व जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी नमूद करायचा आहे.
3- त्यानंतर यातील पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराच्या संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी संपूर्ण माहिती द्यायची आहे व गाव तसेच तालुका आणि जिल्ह्याचे नाव देखील लिहायच आहे.
4- त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय आहे.त्यातील मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहिणे गरजेचे आहे. त्यापुढे परत तालुक्याचे नाव, गावाचे नाव आणि ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा गट क्रमांक टाकायचा आहे.
5- यामध्ये तिसरा पर्याय असतो तो म्हणजे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम या पर्यायासमोर तुम्हाला मोजणीची फीची रक्कम द्यायची आहे आणि त्यासाठीचा चलन पावतीचा क्रमांक व तारीख टाकायचे आहे.
जमीन मोजण्यासाठी किती लागेल पैसा?
जमीन मोजण्यासाठी जी काही फी आकारली जाते ती या जमिनीची मोजणी करायची आहे त्याचे क्षेत्र व किती कालावधीत जमीन मोजणी करून घ्यायची आहे यावरून फी ठरते.साधारणपणे एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असेल तर एक हजार रुपये, तातडीची मोजणी करायची असेल तर दोन हजार रुपये तर अति तातडीच्या मोजणी करिता 3000 रुपये इतके शुल्क आकारले जाते.
जमीन मोजण्यासाठी कुठे संपर्क कराल?
तुम्हाला देखील जमीन मोजणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाच्या भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधने गरजेचे आहे.
जमीन मोजणीसाठी अर्ज ते पुढील प्रक्रिया
शेत जमिनीची मोजणी आणायची असेल तर याकरिता मोजणीचा अर्ज, भरलेल्या शुल्काचे चलन किंवा पावती, तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा ही कागदपत्र प्रामुख्याने लागतात. समजा तुम्हाला शेतजमिनी व्यतिरिक्त इतर स्थावर मालमत्ता म्हणजेच घर किंवा बंगला, औद्योगिक जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दीची निश्चिती करायची असेल तर याकरिता तुम्हाला तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.
हे सगळे झाल्यानंतर किंवा ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांसहित तो मोजणीचा अर्ज संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचा असतो. जमा केल्यानंतर तो ई मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती शुल्क लागणार आहे याचे चलन जनरेट केले जाते.
जे काही चलन सांगितले असेल ते शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन भरायचे असते. त्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणीचा क्रमांक त्या ठिकाणी तयार होतो व मग त्यानंतर शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. पोहोचमध्ये मोजणीचा दिनांक तसेच मोजण्यासाठी येणारा कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली असते.
जमीन मोजणीचे तीन प्रकार
जमीन मोजणीचे तीन प्रकार असून त्यानुसार जमीन मोजणी किती दिवसात पाहिजे किंवा येईल हे ठरते. यातील पहिला प्रकार म्हणजे साधी मोजणी म्हणजेच ती 180 दिवसात येते. दुसरी तातडीची मोजणी कमीत कमी 80 दिवस आणि अति तातडीची मोजणी 60 दिवस असे साधारणपणे जमीन मोजण्याचे प्रकार आहेत.