कृषी

पशुपालकांसाठी दिलासादायक ! महाराष्ट्रात जनावरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश पारित

Published by
Ajay Patil

Lumpy Skin Disease : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लंपी आजाराचा कहर सुरु होता. मात्र आता या आजारावर प्रशासनाला आणि सरकारला नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव आता खूपच कमी झाला असल्याने तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले गेले असल्याने आता शासनाने पुन्हा एकदा बंद असलेले जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश पारित केले आहेत.

दरम्यान लंपी आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात संबंधित पशुपालक शेतकरी बांधवांना एका महिन्याच्या आत अनुदान वितरित केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

खरं पाहता महाराष्ट्रात लंपी आजाराचा शिरकाव झाला आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने जनावरांचे बाजार, पशुधनाची वाहतूक, मेळावे, शर्यती बंद केल्या होत्या.

यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देखील शासनाकडून जनावरांचे बाजार सुरू करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जात नव्हत्या. विशेष म्हणजे, व्यापारी आणि दलालांकडून सर्रास जनावरांचे व्यवहार केले जात होते.

यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांचे बाजार सुरू करण्यासाठी मोठी मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर आठवडाभरापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरू झाले. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनावरांचे बाजार सुरू करण्यासाठी आदेश निर्गमित झाले आहेत.

तसेच शर्यती देखील सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.

साहजिकच आता शेतकरी बांधवांची जनावरे खरेदी विक्री करण्याची अडचण दूर होणार आहे. विशेष म्हणजे या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मोबदल्यात संबंधित पशुपालक शेतकरी बांधवांना अनुदानाची रक्कम देण्याची कारवाई देखील जोरात सुरू आहे.

यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळत आहे.
Ajay Patil