Lumpy Skin Disease : मित्रांनो भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन व्हायरसने (Lumpy Virus) पशुधनाला मोठी हानी पोहोचवली आहे. त्यामुळे गोवंश धोक्यात आले आहे. लंपी स्किन व्हायरस या रोगामुळे गायींचा मृत्यू होतं आहे.
एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे 70 हजार गायींचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. निश्चितच या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये (Livestock Farmer) भीतीचे वातावरण आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. यामुळे शासनाकडून योग्य त्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत. शिवाय शासनाने पशुपालक शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्यासाठी या व्हायरसमुळे दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात अनुदान (Lumpy Virus Subsidy) देण्याची घोषणा देखील केली आहे.
लम्पी व्हायरसमुळे अनेक भागात दुधाच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे लसीकरण सुरू झाले आहे. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया की लंपी संसर्ग झालेल्या गायींच्या दुधाचे (Lumpy Virus Cow Milk) सेवन मानवांसाठी योग्य आहे की नाही?
दुधावर लम्पी विषाणूचा प्रभाव
लखनौ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, गायींच्या दुधात लम्पी विषाणूचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. परंतु ते दुधापासून दूर केले जाऊ शकते. दूध काढल्यानंतर प्रथम दूध चांगले उकळून घ्यावे व नंतर ते स्वच्छ भांड्यात ठेवावे. असे केल्याने विषाणू दुधातच नष्ट होतात. यानंतरच तुम्ही गायीचे दूध वापरू शकतात. म्हणजेच संक्रमित पशूंचे कच्चे दूध पिऊ नये मात्र संक्रमित पशूंचे दूध उकळून पिल्याने मानवी आरोग्याला कसलाच धोका निर्माण होत नाही.
लक्षात ठेवा की, विषाणूची लागण झालेल्या गायींच्या वासरांना गाईपासून दूर ठेवा. कारण गाईच्या दुधापासून वासरे या विषाणूचे बळी ठरू शकतात. मित्रांनो, आजपर्यंत देशात मानवांमध्ये लम्पी व्हायरसचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही, परंतु तरीही वैज्ञानिकांनी ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दुधात घट
व्हायरसमुळे गायीचे दूध कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. राजस्थानमध्ये दुधाचे प्रमाण दररोज 3 ते 4 लाख लिटर कमी होत आहे. एवढेच नाही तर इतर राज्यांतही गाईच्या दुधाची स्थिती अशीच आहे.
अशा परिस्थितीत, सरकारने सर्व पशुपालकांना त्यांच्या गायींना या विषाणूपासून वाचवण्यासाठी गोट पॉक्स लस घेण्यास सांगितले आहे. ही लस प्रथम शेळ्यांमध्ये वापरली गेली. जेणेकरून त्यांना विषाणूचा संसर्ग टाळता येईल.