सध्या हवामान बदल,अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर धोक्यात आल्याची स्थिती आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हाताचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होताना दिसून येत आहे.
तसेच काही वर्षांपासून शेतीमालाचे सातत्याने घसरलेले बाजार भाव हे देखील शेतकऱ्यांपुढील मोठी समस्या आहे. त्यामुळे आता पिक पद्धतीत आणि शेतीत बऱ्याच अंशाने बदल करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे काही शेतकरी आता शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असून नवनवीन पिक लागवडीचे प्रयोग यशस्वी देखील करत आहेत.
अगदी यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सारखे आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात सफरचंदाची केलेली यशस्वी लागवड हे उत्तम उदाहरण सांगता येईल.
अगदी याच पद्धतीने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात असलेल्या घनसांगवी येथील महादेव सुपेकर या शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची लागवड करून ती यशस्वी केलेली आहे. त्यामुळे या लेखात आपण महादेव सुपेकर यांची यशोगाथा बघणार आहोत.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने साडेतीन एकरमध्ये केली सफरचंदाची यशस्वी लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील शेतकरी महादेव सुपेकर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र ते सरकारी नोकरीला असल्याने त्यांना जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे स्थायिक व्हावे लागले. त्या ठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी शेती करायचे ठरवले.
परंतु शेती करायची म्हणून त्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करायची हा विचार त्यांच्या मनात असताना सफरचंदाची लागवड का करू नये असा प्रश्न त्यांच्या मनात आला. परंतु मराठवाड्यासारख्या परिसरामध्ये सफरचंदाचे पीक येईल का हा देखील एक मोठा प्रश्न होता.
परंतु तरी देखील त्यांनी सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला. अगदी काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे सफरचंदाची शेती केली जाते त्या पद्धतीनेच नियोजन आपण या ठिकाणी करायचे असा निर्णय त्यांनी मनाशी घेतला व त्याबद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली.
सफरचंद पिकाबद्दल माहिती घेत असताना त्यांना कळले की सफरचंदाची हरीमन 99 ही जात उष्ण प्रदेशांमध्ये किंवा उष्ण हवामानामध्ये देखील चांगली वाढते व त्यामुळे त्यांनी थेट हिमाचल प्रदेश येथून 1000 सफरचंद रोपांची नोंदणी केली व विमानाने ते रोपे संभाजीनगर व तेथून रस्ते मार्गाने घनसांगवी येथील शेतात आणली.
या 1000 रोपांची लागवड त्यांनी 12 बाय 12 फूट अंतरावर साडेतीन एकर क्षेत्रामध्ये केली. सफरचंदाच्या झाडांना जास्त पाणी लागत नाही व माती देखील हलकी लागते असे त्यांनी सांगितले. लागवड केल्यानंतर आवश्यक ते योग्य व्यवस्थापन महादेव सुपेकर यांनी ठेवले व अप्रतिम नियोजनामुळे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी सफरचंदाच्या झाडांना सफरचंदाची फळे लगडलेली असून त्यांचे उत्पादन आता मिळू लागले आहे.
जवळपास यात सफरचंदाची लागवड करायला चार वर्षे झाली असून एकेका झाडावर आता दहा ते बारा किलो सफरचंदाचे उत्पादन त्यांना मिळत आहे. साधारणपणे 200 ते 250 कॅरेट सफरचंदाचे उत्पादन मिळेल अशी
अपेक्षा त्यांना असून सध्या सफरचंदाला 120 ते 150 रुपये प्रति किलो इतका दर मिळत असल्याने या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळण्याची अपेक्षा देखील त्यांना आहे. तसेच सफरचंदाच्या देखभालीमध्ये महादेव सुपेकर यांना त्यांच्या पत्नी सुषमा सुपेकर यांची देखील मोलाची साथ मिळाली.
अशा पद्धतीने अभ्यास आणि व्यवस्थापन व मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द असेल तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करता येते हे महादेव सुपेकर यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.