Mini Tractor Subsidy:-शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बचत गटांसाठी सरकारने मिनी ट्रॅक्टर योजना जाहीर केली असून यामध्ये ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने उपलब्ध होणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार असून योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ देण्यात आली आहे.
योजनेचा हेतू आणि फायदे
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बचत गटांना आधुनिक कृषी साधनसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०१७ च्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा व उत्पादन वाढीला मदत मिळावी आणि शेतीतील श्रम व वेळ वाचावा यासाठी सरकार तीन लाख 15 हजार रुपये मिनी ट्रॅक्टरवर अनुदान देत आहे.
अनुदानाचे स्वरूप
एकूण प्रकल्प खर्च ३,५०,००० असून सरकारकडून अनुदान ३,१५,००० मिळणार आहे.
बचत गटाच्या स्वतःचा हिस्सा म्हणून ३५,००० जमा करणे गरजेचे आहे.हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून, त्यानंतर त्यांना ट्रॅक्टर आणि उपसाधने खरेदी करता येणार आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज करण्यासाठी वेबसाईट
https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे.अर्ज ऑनलाइन भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.अर्जाची प्रिंट काढून झेरॉक्स कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात सादर करावीत.पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.निवड झाल्यास बचत गटांना अनुदान दिले जाईल आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रक्रिया सुरू होईल.
पात्रता आणि अटी-शर्ती
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
बचत गटामधील किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदीसाठी ₹३.१५ लाख सरकारी अनुदान उपलब्ध असेल.
अर्जांची संख्या अधिक झाल्यास लॉटरी पद्धतीने अर्जदारांची निवड केली जाईल.