कृषी

आमदार आशुतोष काळे यांनी केली स्वतःच्या शेतातील ई-पिक नोंदणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने ई-पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःच्या शेतातील पिक नोंदणी करून केला आहे.

रु आम्ही केली आता तुम्हीही करार, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे म्हणाले की, २०१९ ते २०२२ मध्ये सातत्याने अतिवृष्टी होवून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर २०२३ मध्ये दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून यावर्षी अवकाळी पाऊस होवून द्राक्ष, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

आजपर्यंत कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ज्या-ज्या वेळी नुकसान झाले आहे. त्या-त्या वेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.

यावर्षी कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना देखील आपल्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता. त्याबाबत शासनाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे. तसेच पिक विम्याची सोयाबीन पिकाची अग्रिम नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.

तरी देखील यापुढील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने ई- पिक पाहणी अँप च्या माध्यमातून शेतातील पिक नोंदणी सुरु केली आहे.

या मोहिमेत मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकाची ई-पिक नोंदणी करावी, असे आवाहन आ. काळे यांनी केले. यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार सातपुते, उपसरपंच भास्करराव काळे, सुंदरराव काळे, भागीनाथ काळे, प्रकाश काळे, जगन्नाथ जाधव, गणेश रोकडे उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office