कृषी

नंदनवार बंधूंनी केली शेतीत कमाल! या तीन प्रकारच्या भाजीपाला पिकांनी बनवले लखपती, वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

सध्या नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेने ते खूपच अत्यल्प असून जवळजवळ सरकारी नोकरी मिळणे कठीण होऊन गेले आहे. त्यातच जर तुम्हाला खाजगी कंपनीमध्ये काम करायचे असेल तर बारा तास काम करून मात्र आठ ते दहा हजार इतक्या कमी पगारावर तुम्हाला नोकरी करायला लागते. याच्यामधून तुमचा महिन्याचा कुटुंबाचा खर्च आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण करणे देखील कठीण होऊन जाते.

अगोदरच महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे वाढता खर्च आणि त्यामानाने उत्पन्न कमी अशा गर्तेत अनेक तरुण अडकलेले दिसतात. त्यामुळे नक्कीच नोकरीच्या मागे न लागता जर तुमची घरची शेती असेल तर तरुणांनी शेतीमध्ये करियर करणे खूप गरजेचे आहे. कारण आजकालची शेती ही परंपरागत राहिली नसून ती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असल्यामुळे तसेच अनेक आधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान देखील शेतीमध्ये आल्याकारणाने शेती आता खूप फायदेशीर ठरत आहे.

त्यामुळे अनेक तरुण आता नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे देखील आता  लक्ष पुरवत आहेत. समाजामध्ये आपण पाहतो की बरेच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत असल्याने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील मिळत आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण भंडारा जिल्ह्यातील पालांदूर या गावच्या स्वप्निल नंदनवार या तरुणाची कहाणी पाहिली तर ती काहीशी असीच आहे.

 कारले तसेच स्वीट कॉर्न आणि टोमॅटो शेतीतून तीन भाऊ बनले लखपती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर या ठिकाणचे स्वप्निल नंदनवार यांचे शिक्षण डीएड पर्यंत पूर्ण झाले असून नोकरीच्या मागे न लागता ते शेती करत असून त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करत आहे. स्वप्निल नंदनवार हे परिसरातील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांना दोन भावंडे असून त्यांनी शिक्षण घेऊन नोकरी करिता खूप प्रयत्न केले.

परंतु त्यांना योग्य ठिकाणी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता काय करावे या विचारात असतानाच त्यांनी शेती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व शेती करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वप्निल व या त्यांच्या दोन भावंड अशा तिघांनी मिळून भाजीपाल्याची शेती करायचे निश्चित केले. स्वप्निल नंदनवार यांना आशिष आणि अंकुश नावाची हे दोघ भावंडे आहेत. शेतीमध्ये उतरल्यानंतर या तीनही भावंड उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची हे माहित असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवात करताना त्यांनी दीड एकर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली व यापैकी काकडी या पिकाने त्यांना खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून दिले. त्यामुळे त्यांनी भाजीपाल्याची शेती अधिक तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याचे ठरवले व चार एकर क्षेत्रावर कारले, स्वीट कॉर्न तसेच लाल टोमॅटोची शेती करत त्यांनी खूप चांगला नफा मिळवला.विशेष म्हणजे पारंपारिक शेतीला बगल देत त्यांनी नव्या जोमाने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे ठरवले.

या तिघ भावंडांपैकी आशिष नंदनवार यांना मार्केटिंगचे चांगले ज्ञान असल्यामुळे त्यांनी त्या ज्ञानाचा वापर भाजीपाला विक्रीमध्ये केला. प्रामुख्याने भाजीपाला विक्रीचे नियोजन आशिष नंदनवार हेच करतात व स्वप्नील आणि अंकुश हे इतर कामांचे नियोजन करतात. त्यामुळे भावाभावातील एकी, व्यवस्थित नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेतीतून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवला व सर्वत्र त्यांच्या आता कौतुक केले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil