कृषी

नांदेड जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने फळ आणि रोप विक्रीतून वार्षिक मिळवला 25 लाखांचा नफा! विविध फळपीक लागवडीतून साधली आर्थिक समृद्ध

Published by
Ajay Patil

सुशिक्षित बेरोजगारी ही देशापुढील ज्वलंत समस्या असून दिवसेंदिवस या समस्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक तरुण विविध व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व प्रामुख्याने अनेक तरुण शेती व शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांकडे वळले आहेत.

या सुशिक्षित तरुणांनी शेतीचा चेहरामोहरा बदलवून टाकल्याचे आपल्याला दिसून येते. कारण अशा तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक पिके व शेती पद्धती यांना फाटा देत आधुनिक शेती करण्याला प्राधान्य दिलेले आहे. तसेच विविध फळबाग लागवडीतून आर्थिक समृद्धी साधण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यातील नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर या तरुणाने स्पर्धा परीक्षांची तयारी सोडून शेती करायला सुरुवात केली व आज या माध्यमातून तो लाखोत नफा मिळवत आहे.

 नंदकिशोर गायकवाड यांनी मिश्र फळ शेतीतून साधली प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यात असलेल्या भोकर तालुक्यातील भोसरी या गावचे रहिवासी असलेले नंदकिशोर गायकवाड हे उच्च शिक्षित असून त्यांना अधिकारी व्हायचे होते व याकरिता त्यांनी प्रयत्न देखील सुरू केलेले होते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी पुणे शहर गाठले. पुण्यात राहून तब्बल चार ते पाच वर्ष स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी देखील केली.

परंतु मध्यंतरी अचानक कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर आले व भारतात देखील लॉकडाऊन लागले व त्यानंतर मात्र किशोर यांना पुण्यात राहणे शक्य झाले नाही व त्यांनी सरळ गावी येण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर खचून न जाता शेती करावी असा निर्णय घेऊन शेती करायला सुरुवात केली.

त्यांच्या घरची वडीलोपार्जित डोंगराळ जमिनीमध्ये शेती असून ती करण्याला त्यांनी सुरुवात केली व अगदी सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर उसाची लागवड करून पहिल्याच प्रयत्नामध्ये तब्बल 160 टन उसाचे भरघोस उत्पादन मिळवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी या डोंगराळ जमिनीमध्ये आंबा, जांभूळ तसेच फणस व पेरू, जपान आणि थायलंड चा आंबा, सफरचंद, जपान व मलेशातील पेरू, काळे व पांढऱ्या रंगाची जांभळे, फणस तसेच मसाल्याच्या पिकांमध्ये दालचिनी, इलायची  आणि लवंग सारख्या पिकांची लागवड केली.

आजमीतिला या सगळ्या फळबागांमधून नंदकिशोर गायकवाड यांना चांगले यश मिळाले असून फळांची आणि रोपांच्या विक्रीतून त्यांनी 35 लाखांचे उत्पन्न मिळवले व यातून झालेला दहा लाखाचा खर्च वजा जाता पंचवीस लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.

नंदकिशोर यांनी या फळझाडांमध्ये बाराशे झाडे हे जपान व थायलंड मधील आंब्याची, तेराशे झाडे सीताफळ, रेड डायमंड पेरू, मलेशिया पेरूची 3500 झाडे, जांभळाची 100 आणि लिंबोणीचे चारशे व सफरचंदाची 400( उन्हाळी) याप्रकारे फळबाग लागवडीचे नियोजन केलेले आहे.

विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीचा वापर करून त्यांनी हा प्रयोग केला आहे. गेल्या दोन वर्षापासून फळांचे उत्पादन मिळायला लागले असून आजूबाजूच्या राज्यातून देखील त्यांच्या फळांना मागणी वाढली असून त्याशिवाय सौदी अरब व कतारमधून देखील फळांना मागणी चांगली आली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या फळांची जागेवरच विक्री झाली व नफा चांगला मिळाला.

Ajay Patil