Farming News : पाऊस होईना…. सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming News : पावसाने सर्वत्र उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरा सपशेल फेल जाणार आहे. उन्हाचा चटका बसून पीके करपू लागली आहे, तर बहुतेक ठिकाणी पिकाच्या वाती तयार झाल्या आहेत. शेतकरी वर्गाच्या दोन तीन वर्षांपासून संकटमोचन ठरलेल्या सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार आहे.

वर्षभराचे शेतीचे आर्थिक नियोजन कोलमडून जाणार असल्याने शेतकरी वर्गाच्या कर्जात आणखी भर पडणार असल्याने पिकासोबत शेतकरी वर्गही कोमात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने ताबडतोब पंचनामे चालू करून शेतकरी वर्गास आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सुरवाती पासून रेंगाळत चाललेल्या मान्सूनने आज पर्यंत शेतकरी वर्गास ठेंगा दाखवला. जेमतेम पडलेल्या पावसावर ठराविक ठिकाणीच खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यावरही निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने भर पावसळ्यात तुषार सिंचन, ठिबकद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली.

प्रत्येक गावातील गावतळे वर्षभरापासून कोरडेठाक पडले आहे. विहिरी, कूपनलिका यातील पाणी शेवटच्या घटका मोजत असून एक किंवा दोन तास पेक्षा तग धरत नाही. पाटपाणी मिळवण्यासाठी संबंधित विभागाने फॉर्म भरून घेण्यासाठी दुष्काळात पठाणी वसूली चालू केली.

आधीच पावसाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गास मात्र ही वसुली दुष्काळात तेरावा महिना ठरू पहात आहे. त्यातच ऑगस्ट महिना संपत आला तरी वरुणराजा रुसलेल्या असल्याने आता शेतकरी वर्गाचा काळजाचा ठेका चुकत आहे.

बहुतेक शेतकरी वर्गाकडे पशुधन असल्याने हिरवा चारा (मुरघास ) संपला आहे. त्यामुळे दूध व्यवसायवर त्याचा विपरीत परिणाम सुरू झाला आहे. महागडी औषध फवारणी रासायनिक खतांच्या मात्रा देऊन शेतकरी वर्ग फक्त रोज आभाळाकडे नजरा लावून बसला आहे.

पाऊस पडला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असून केलेल्या खर्च फिटणार नसून पुढील सर्व वर्षा चे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. शासनाने त्वरीत पीक पंचनामे करून शेतकरी वर्गास भरीव मदत त्यांच्या बँक खाती वर्ग करावी, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.

■ पुणतांबा मंडळासह प्रत्येक तालुक्यात पर्जन्यप्रमान अल्प आहे. साधारण १३ टक्के फक्त पाऊस झाल्याने पिकांची वाताहत झाली आहे. शेतकरी वर्गांना दुष्काळ जाहीर करून मदतीसाठी संघटनाद्वारे पुढाकार घेणार आहे. – गंगाधर चौधरी, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, नगर उत्तर

■मदत हवी पण .. तातडीची बहुतेक शेतकरी वर्गाची दुबार पेरणी ही वाया गेली आहे. तर अनेक शेतकरी वर्गाची पिके पाण्यावाचून अर्धमेली झाली आहेत. पशुधनाचा चारा संपुष्टात आला असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात खचून गेला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून भरीव मदत करून दिलासा द्यावा. तसचे ओव्हरफ्लोच्या पाण्याने प्रत्येक गावातील गावतळे भरून दयावे, परंतु त्याला विलंब नको. – ॲड. अशोकराव वाघ, शेतकरी चितळी