Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क मागे घेऊन ते शून्य करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते.
त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. काही बाजार समित्यांमध्ये सकाळी किरकोळ प्रमाणात लिलाव झाले. लासलगाव बाजार समितीसह अनेक महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये मात्र शुकशुकाट होता. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी १० वाजता कांदा उत्पादक, बाजार समिती प्रतिनिधी व व्यापाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचे जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने जाहीर केले होते. पहिल्याच दिवशी त्याचे परिणाम घाऊक बाजारात दिसून आले. जिल्ह्यातील १७ पैकी १४ बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होतात.
काही शेतकऱ्यांना याची कल्पना नव्हती. ते विंचूर उपबाजार आणि पिंपळगाव बसवंत येथे टेम्पोत कांदा घेऊन आले होते. मात्र लिलावाअभावी त्यांना माल परत नेण्याची वेळ येऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी संबंधितांच्या मालाचे लिलाव केले. परंतु हे प्रमाण अल्प होते. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजारात संपूर्ण शुकशुकाट होता.
विंचूर उपबाजारात १०८ वाहनांचे लिलाव झाल्याचे समितीकडून सांगण्यात आले. पिंपळगाव बाजारात तसे लिलाव झाले असले तरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे बहुतांश समित्यांमध्ये नियमित लिलाव ठप्प आहेत. नागपंचमीमुळे काही बाजार समित्यांना सुट्टी होती. लिलाव पूर्णतः बंद नसल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी केला. नाशिकसह नगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्येही लिलाव बंद होते, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले.
अन्यथा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनेला चर्चेसाठी बोलावले आहे. कुठलीही नोटीस न देता व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केले. जिल्हा उपनिबंधकांमार्फत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. चर्चेतून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असून, तसे न झाल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आंदोलने…
– निफाड शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा
– कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
– वणीत कांदा उत्पादकांचा रास्ता रोको
– येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
– मनमाडला सकाळी लिलाव, दुपारी शुकशुकाट
-कळवण बाजार समिती बेमुदत बंद
– चांदवडचे शेतकरी आज मुंबई
– आग्रा महामार्ग रोखणार