कृषी

Onion News : तीन दिवसांत १०० कोटींची कांदा उलाढाल ठप्प!

Published by
Ahmednagarlive24 Office

Onion News : जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांच्या बंदच्या सलग तिसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव पूर्णतः ठप्प आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापारी प्रतिनिधींसोबत घेतलेली बैठकही निष्फळ ठरली. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतरही व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून,

सलग तिसऱ्या दिवशी लिलाव बंद राहिल्याने जवळपास १०० कोटींची कांदा उलाढाल ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून, शेतकऱ्यांनंतर आता व्यापाऱ्यांकडून सलग तीन दिवसांपासून बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी व्यापारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनावर चर्चा करीत पणनमंत्र्यांनी मंगळवारी बैठक बोलावली असली तरी व्यापाऱ्यांनी बंद सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यात दररोज किमान पावणेदोन लाख मेट्रिक टन कांद्याचे लिलाव होतात. म्हणजे सरासरी रोज ३२ ते ३३ कोटी रुपयांची उलाढाल त्यातून होते;

परंतु गेल्या तीन दिवसांपासून सलग बाजार समित्या बंद असल्यामुळे जवळपास पाच लाख २५ हजार मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांच्या चाळीतच पडून आहे. त्याचे लिलाव न झाल्यामुळे अंदाजे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

लिलाव बंदवर ठाम असलेल्या व्यापाऱ्यांविरोधात सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कांदा व्यापाऱ्यांना बाजार समित्यांकडून परवानगी रद्द करण्याबाबतच्या नोटीस बजावल्या. तरीही व्यापाऱ्यांनी भूमिकेवर ठाम राहून हा बंद सुरूच ठेवला आहे.

शुक्रवारीही जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बंदच राहिल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर झाला आहे. त्याचबरोबर बहुतांश बाजार समित्या शनिवारी शनिवारी आणि रविवारी बंद असतात, त्यामुळे तो फटकादेखील शेतकऱ्यांसह संपूर्ण उलाढालीला बसणार आहे

Ahmednagarlive24 Office