ढगाळ वातावरणासह धुक्यामुळे फळबागा धोक्यात ! फवारणीचा खर्च वाढला

Ahmednagarlive24 office
Published:
Agricultural News

Agricultural News : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलग तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे व सोबत धुके पडल्याने, रब्बी हंगामातील पिकांसोबत द्राक्ष व डाळिंब बागेस मोठा फटका बसला आहे. महागडी औषधे व फवारणीचा खर्च वाढल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत चालू आहे.

बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागेसह डाळिंब बागांवर अवकाळीने संक्रात आणल्याने फळबाग शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडून, चितेचे ढग भरून आले आहे. आत बटट्याचा झालेल्या शेती व्यवसायाची संकटाची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

त्यात पूर्ण नाकीनऊ आणलेल्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम सपशेल फेल ठरवला. उत्पादन कोसोदूर राहिले, केलेला शेती मशागतीचा खर्च सुद्धा पदरात पडला नाही. याही परिस्थित ठराविक तग धरून राहिलेल्या शेतकऱ्यांनी फळबागा जगविण्यासाठी जीवाचा आटापिटा करून त्याचे संगोपन केले.

उसनवारी करून बागांची छाटणी, अंतर मशागत, विविध बेसिक रासायनिक, शेणखत खतांच्या मात्रा देत द्राक्ष बाग व डाळींब बाग फळधारणा करण्याच्या प्रक्रियेत आणल्या मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकाबरोबर या फळबागावर निसर्गाची वक्रदृष्टीने रोगराईला आमंत्रण दिले.

परिणामी करपा, डाऊनी, फळकुज, तसेच बुरशीजन्य रोगांच्या भीतीने विविध प्रकारचे महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ फळबाग शेतकऱ्यांसह इतर रब्बी हंगामातील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांवर आली आहे.

■दहा दिवसांत दोनदा फवारणी..!

बदलत्या वातावरणामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डाळिंब बागेवर फवारणी केली होती; परंतु दोन दिवसांपासून बदलेले वातावरण व पावसाच्या हलक्या सरी, धुके यामुळे करपा व बुरशीजन्य रोगाचे अतिक्रमण होण्याची भीती आहे. त्यासाठी पुन्हा फवारणी करावी लागल्याने १० दिवसांत आठ ते दहा हजार रुपये फवारणीचा खर्च झाला आहे. – सुधीर वाघ, डाळिंब उत्पादक शेतकरी, चितळी

■मदत मात्र तोकडी..!

फळबागा निसर्गाच्या लहरीपणाचा कचाट्यात सापडल्या आहेत. संबंधित कृषी विभागाने वेळोवेळी फळबागांना भेट देऊन मार्गदर्शन व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा दिला पाहिजे: मात्र तोकडी मदत न करता झालेला खर्च व निघणारे उत्पादन यांची सांगड बसणे गरजचे आहे. – संपत वाघ, डाळिंब उत्पादक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe