Custard Apple Farming:- महाराष्ट्रातील शेतीमध्ये आता फळबाग लागवड दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रमध्ये अगोदर देखील फळबाग लागवड होती. परंतु हव्या त्या प्रमाणामध्ये फळबाग लागवडीखाली क्षेत्रामध्ये वाढ झालेली नव्हती.
परंतु कालांतराने आता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्याने व परंपरागत शेती पद्धत व परंपरागत पिके यांना फाटा देत वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके व फळपीक लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळल्याने गेल्या दशकभरापासून फळबाग लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.
यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लागवड केली जात असलेली फळपिके जर पाहिली तर यात डाळिंब, द्राक्ष तसेच पेरू आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे फळपीक म्हणून प्रसिद्ध असणारे सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आपल्याला दिसून येते.
परंतु आता ड्रॅगन फ्रुट सारख्या विदेशी फळाची लागवड देखील गेल्या दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वाढल्याचे चित्र आहे. या फळ पिकांमध्ये जर आपण सिताफळ हे पिक पाहिले तर कमी खर्चात येणारे पीक म्हणून ते ओळखले जाते.
या सीताफळ पिकाच्या अनुषंगाने जर आपण चांदुर रेल्वे शहरातील प्रगतिशील शेतकरी युवराज खेरडे यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी 2017 मध्ये सिताफळ लागवड करण्याचा निश्चय केला व सिताफळ लागवड केली.
आज सिताफळ शेतीतून ते लाखो रुपयांमध्ये उत्पन्न घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे नेमके नियोजन आणि योग्य विक्री व्यवस्थापन करून शेतीमधून कसे लाखो रुपये मिळवता येतात? याचे उत्तम उदाहरण आपल्याला युवराज खेरडे यांच्या माध्यमातून घेता येईल.
युवराज खेरडे यांनी सिताफळ लागवडीतून साधली आर्थिक समृद्ध
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदुर रेल्वे येथील प्रगतिशील शेतकरी युवराज खेरडे यांच्याकडे एकूण 25 एकर जमीन आहे. सन 2017 पर्यंत ते कपाशी तसेच सोयाबीन, हरभरा इत्यादी पारंपारिक पिकांची लागवड करत होते. परंतु या पिकांसाठी होणारा खर्च व त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन यांचा मात्र कुठेही ताळमेळ बसत नव्हता.
त्यामुळे शेतीत काहीतरी नवीन करावे या उद्देशाने त्यांनी चाचपणी सुरू केली. या कालावधीतच 2016 मध्ये शिवाजी कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमामध्ये त्यांना सिताफळ लागवडीबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी जळगाव येथे जाऊन जैन हिल व बेंगलोर येथील सीताफळ संशोधन लागवड केंद्र व आंध्र प्रदेश राज्यातील संगारेड्डी येथील सीताफळ संशोधन केंद्राला भेटी दिल्या व त्या ठिकाणी सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती घेतली व बारामती येथून लागवडीसाठी रोपांची खरेदी केली.
जेव्हा त्यांनी सिताफळ लागवड केली तेव्हा त्यांना पहिल्या वर्षी जे उत्पादन मिळाले त्यातून त्यांच्या हाती सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले व त्यातून केलेला खर्च वजा जाता जवळपास 70 हजारांचा नफा त्यांना झाला व त्यामुळे त्यांचा उत्साह वाढीस लागून 2020 मध्ये पुन्हा त्यांनी 250 झाडांची लागवड केली.
यावर्षी संपूर्ण सीताफळ बागेतून त्यांनी चार हजार किलो सीताफळांचे उत्पादन घेतले व शंभर रुपये किलो दराने त्यांची विक्री केली. परंतु विक्री करताना त्यांनी सिताफळ बाजारपेठेत न नेता चांदुर रेल्वे अमरावती रोडवर त्यांच्या पत्नी छाया खेरडे व कुटुंबाने सीताफळाची विक्री केली व अशा पद्धतीच्या विक्रीमुळे सीताफळाला दर देखील चांगला मिळाला व लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले.