Poultry Farming Success Story:- कुठल्याही गोष्टीची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळ्या आवश्यक गोष्टींपेक्षा तुमच्या मनाची तयारी त्यासाठी असणे खूप गरजेचे असते. जर तुमची मनाची तयारी असली तर तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात अगदी जोमाने करू शकतात व त्यामध्ये आनंदाने देखील काम करून यश मिळवू शकतात.
साधारणपणे हा मुद्दा सर्वच क्षेत्रामध्ये लागू होतो व त्याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही. आपण शेतीमध्ये किंवा शेती संबंधित असलेल्या जोडधंद्यांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींची यशोगाथा पाहिली तर सुरुवात ही छोटीशी केलेली असते परंतु त्यामध्ये कष्ट, नियोजनबद्ध अभ्यास आणि त्या दृष्टिकोनातून केलेले बदल, सातत्य इत्यादी अनेक गुणांच्या जोरावर असे जोडधंदे यशाच्या शिखरावर पोहोचवलेले असतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण नाशिक जिल्ह्यातील मनोज कापसे यांचा विचार केला तर त्यांनी देखील अगदी छोट्याशा प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली व आज त्यांचा हा व्यवसाय यशाच्या शिखरावर आहे. या लेखामध्ये आपण मनोज आनंदा कापसे यांची यशोगाथा बघणार आहोत.
मनोज कापसे यांच्या पोल्ट्री व्यवसायाची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यात असलेल्या पिंपळगाव वाखारी या गावचे मनोज कापसे यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी पदवीत्तर शिक्षण घेऊन नोकरी न शोधता एसटीडी बूथ सुरू केला.
या त्यांच्या एसटीडी बूथ वर अनेक पोल्ट्री व्यवसाय असलेले शेतकरी यायचे व त्यांचे व व्यापाऱ्यांशी संपर्क करण्याचे महत्त्वाचे काम मनोज यांच्या एसटीडी बूथवर केले जायचे. यादरम्यानच त्यांना काही व्यापाऱ्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून त्यांनी याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली व पूर्ण विचार करून बँक, पतसंस्था आणि काही उसनवारी पैसे घेऊन 5000 पिल्ले मावतील या क्षमतेचे एक शेड बांधले व व्यवसायाला सुरुवात केली.
अगोदर कुठलाही व्यवसायामध्ये जसे चढ-उतार येतात तसेच त्यांना देखील अनुभवायला मिळाले. परंतु कुठल्याही पद्धतीची हार न पत्करता त्यांनी चिकाटीने हा व्यवसाय वाढवणे सुरू ठेवले. अनेक विपरीत परिस्थिती असताना देखील त्यांनी स्थानिक अभ्यासू पोल्ट्री उत्पादक होतात त्यांचे मार्गदर्शन घेत टप्प्याटप्प्याने काम सुरू ठेवले व यश मिळवत गेले.
या गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या
पोल्ट्री उद्योगांमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणे गरजेचे आहे व यामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा खाद्यावर होतो हे मनोज यांनी ओळखले व त्यामुळे त्यांनी स्वतःचीच फीडमिल उभारून खाद्यनिर्मिती देखील सुरू केली. यासाठी त्यांनी अगोदर घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केले असल्यामुळे त्यांना भांडवलाची समस्या देखील जास्त जाणवली नाही.
कर्ज वेळेवर परत केल्यामुळे त्यांची पत सुधारली होती व त्यातूनच त्यांना कॅश क्रेडिटची सुविधा देखील उपलब्ध झालेली होती. त्यामुळे त्यांना आलेल्या पैशांच्या समस्या चुटकीसरशी दूर होत केल्या व विविध प्रकारचे व्यवस्थापन करताना त्यांना पैसा उपलब्ध झाला.
तसेच शास्त्रीय पद्धतींचा अवलंब व व्यवस्थापन व सूक्ष्म नियोजन यांची व्यवस्थित सांगड त्यांनी घातली. एवढेच नाही तर विविध चर्चासत्र तसेच परिसंवाद व अभ्यास दौऱ्यामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला व या माध्यमातून नामवंत व तज्ञ उद्योजकांचे ते मार्गदर्शन मिळाले त्याचा वापर त्यांनी त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी केला.
आज असलेले त्यांच्या पोल्ट्री व्यवसायाचे स्वरूप
पाच हजार पक्षांपासून सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय आज दहा पटीने वाढला असून त्यांचे आज स्वतःचे 50 हजार पक्षी क्षमतेचे शेड आहेत व तीस हजार क्षमतेचे शेड त्यांनी भाडेतत्त्वावर घेतले असून असे एकूण मिळून ते आज 80 हजार पक्षांचे संगोपन करतात. एका वर्षामध्ये ते पाच बॅच घेतात व त्यांची वार्षिक एकूण पक्षी उत्पादनाची क्षमता पाहिली तर ती चार लाखापर्यंत पोहोचलेली आहे.
कसे आहे त्यांचे उद्योगाचे अर्थकारण?
जर आपण श्रावण महिना तसेच पावसाळ्याचा कालावधी पाहिला तर यामध्ये बाजारपेठेमध्ये मागणीत गट होते व त्यामुळे एकूण बाजारपेठेच्या स्थितीचा अभ्यास करून पुरवठा संतुलित होण्याच्या दृष्टीने पक्षांची प्लेसमेंट मर्यादित ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. तसेच एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव जर काही काळ असला तर या कालावधीमध्ये अत्यंत लक्ष ठेवले जाते व काटेकोर संगोपन देखील केले जाते.
त्यामुळे जेव्हा बाजारपेठेत आवक कमी होते तेव्हा त्यांचा या नियोजनाचा मोठा फायदा त्यांना होत असतो. आज जर पक्षांचा म्हणजेच कोंबड्यांचा दर पाहिला तर तो दररोज बदलतो. कधी तो 60 ते 65 रुपये प्रति किलो मिळतो तर कधी 120 ते 125 रुपयाच्या पुढे देखील जातो.
एका किलोमागे खर्च हा 85 रुपयांच्या पुढे जातो त्यामुळे नफा आणि तोट्याचे गणित देखील बदलत राहते.आज जर आपण मनोज कापसे यांचा विचार केला तर त्यांची वडीलोपार्जित जी काही अडीच एकर शेती होती ती आता सात एकर वर नेणे त्यांना या व्यवसायामुळे शक्य झालेले आहे. तसेच त्यांचे दोघेही मुले आज चांगली शिक्षण घेत असून या उद्योगांनी त्यांना आर्थिक समृद्धी तर दिलीच परंतु एक सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळवून दिलेली आहे.