Poultry Farming:- आताचे तरुण नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांना एखाद्या व्यवसायाच्या किंवा सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून खूप उत्सुक असतात व त्यासाठी वाटेल ती किंमत किंवा वाटेल ते प्रयत्न करण्याची देखील तरुणांची तयारी असते. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून कल्पना सुचून त्यातून एखादा व्यवसायाची निर्मिती होणे व तोच व्यवसाय आपली ओळख होणे हा प्रवास वाटतो तितका सोपा देखील नसतो.
यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग तसेच प्रचंड प्रमाणात कष्ट आणि आवश्यक गोष्टींचा अभ्यास हा लागतोच. आता जर आपण पोल्ट्री व्यवसायाचा विचार केला तर साधारणपणे ब्रॉयलर जातीच्या कोंबड्यांचे पालन हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते किंवा लेयर पोल्ट्री फार्मिंग हा पोल्ट्रीचा प्रकार अंडी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात.
परंतु गावरान कोंबडी पालनातून कोणी कोटी रुपये कमवत असेल आणि ते देखील 23 वर्षाचा एक तरुण तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. पुण्याजवळील चांदखेडे येथील सौरभ तापकीर या 23 वर्षाच्या तरुणाने ही किमया करून दाखवली आहे.
गावरान पोल्ट्री फार्मिंग मधून करोडोंची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहरातील हिंजवडी येथील रहिवासी असलेला सौरभ याने पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदखेड या ठिकाणी गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला असून या माध्यमातून तो पाच ते सहा कोटी रुपयांची उलढाल करत आहे.
त्याची नेचर्स बेस्ट नावाची कंपनी असून त्या कंपनीच्या माध्यमातून तो अंडी तसेच चिकन आणि शेतकऱ्यांसाठी चिकनची विक्री करतो. एवढेच नाही तर त्याच्या या कंपनीशी राज्यातील 3000 शेतकरी जोडले गेले आहेत. या तीन हजार शेतकऱ्यांपासून तो अंडी विकत घेतो आणि त्याच अंड्याची विक्री पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये करतो. अशा पद्धतीने त्याचे व्यवसायाचे स्वरूप आहे.
अशी केली व्यवसायाची सुरुवात?
सौरभ तापकीर हा जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा त्याला कबड्डी खेळण्याची खूप मोठी आवड होती व मैदानी खेळांमध्ये जर तुम्हाला तरबेज व्हायचे असेल तर तुमचे आरोग्य तेवढेच सुदृढ असणे गरजेचे असते. या दृष्टिकोनातून अंडी व चिकनचा आहारामध्ये समावेश असणे खूप गरजेचे होते. यामुळे सौरभचे वडील गावरान अंड्याच्या शोधात असायचे. परंतु दररोज गावरान अंडी कुठून मिळणार? या समस्येमुळे सौरभच्या वडिलांनी सौरभला घरी कोंबड्या आणून दिल्या व त्या पाळायला सांगितल्या.
साहजिकच या माध्यमातून अंडी मिळायला लागली व सौरभला ती आहारात देखील फायद्याची ठरली. तसेच अंड्यांसोबत या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ले देखील तयार होऊ लागली. अशा पद्धतीने सौरभने पिल्लांच्या संख्येत वाढ करायला सुरुवात केली आणि 400 ते 500 कोंबड्या त्याच्याकडे तयार झाल्या.
साहजिकच एवढ्या मोठ्या कोंबड्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अंड्यांची मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून वाढू लागली व मांसासाठी जिवंत कोंबड्यांची देखील मागणी वाढली. यामधूनच सौरभच्या लक्षात आले की गावरान कोंबड्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सौरभने व्यवसाय वाढवायचे ठरवले. अशा पद्धतीने तो या व्यवसायात आला.
एवढेच नाही तर त्याच्याकडे जे शेतकरी यायचे त्यांना देखील तो हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना द्यायचा व त्या शेतकऱ्यांना कोंबड्यांची पिल्ले देखील पुरवायचा. अशा शेतकऱ्यांकडून तयार झालेला माल स्वतःच विकत घ्यायचा. अंडी तसेच जिवंत कोंबड्या सौरभ पुणे आणि मुंबईमध्ये सोसायटीमध्ये विकायचा. या कामांमध्ये अभिनव फार्मर्स क्लब कडून देखील त्याला खूप मोठी मदत झाली. असे करता करता सौरभ चा व्यवसाय वाढीस लागला.
जेव्हा अंड्यांची विक्री घरपोच पद्धतीने केली जायची तेव्हा बऱ्याचदा अंड्यांना पॅकिंग नसायची व अंडे खराब व्हायचे. या समस्येवर उपाय म्हणून त्याने अंड्याला व्यवस्थित पॅकिंग असावी या उद्देशाने नेचर्स बेस्ट नावाची कंपनी स्थापन केली व या कंपनीच्याच नावाने अंड्यांची पॅकिंग सुरू केली.
नेचर्स बेस्टच्या एका अंड्याच्या बॉक्समध्ये बारा अंडी मावतात व हा भाग 240 रुपये प्रमाणे थेट ग्राहकांना विक्री केला जातो. आज हळूहळू नेचर्स बेस्ट हा एक मोठा ब्रँड तयार झाला आहे. तसेच गावरान कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अंडी विक्रीची अडचण येत असेल तर अशा शेतकऱ्यांचा माल सौरभ शेतावर जाऊन विकत घेतो व त्याच्या कंपनीच्या माध्यमातून त्याची विक्री करतो. अशा पद्धतीने सौरभने त्याचा व्यवसाय वाढवला.
सौरभला किती मिळत आहे आर्थिक नफा?
सध्या नेचर्स बेस्ट या कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये रोज 80 हजार ते एक लाख तीस हजार गावरान अंड्याची विक्री केली जाते व एक पॅकिंग केलेले अंडे वीस रुपये प्रति नग प्रमाणे विकतो. अंडीच नाही तर जिवंत कोंबडी सुद्धा मागणीनुसार परिस्थिती पाहून कमी जास्त दरामध्ये विक्री केली जाते. साधारणपणे किमान 600 ते कमाल 1200 रुपये प्रति किलो दराने जिवंत कोंबड्यांची विक्री देखील केली जाते.
या सगळ्या माध्यमातून मिळणारे आर्थिक उत्पन्न पाहिले तर एका महिन्यामध्ये नेचर्स बेस्ट या कंपनीची उलाढाल पाच ते सहा कोटी रुपयांची आहे. अवघ्या वयाच्या 17 व्या वर्षी सुरु केलेल्या या व्यवसायाने आता गगन भरारी घेतलेली आहे. गावरान कोंबडी पालनाचे त्याचे स्वतःचे 24 शेड आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून सौरभने करोडपती उद्योजक होण्याचा मान देखील मिळवला आहे.