मजूरटंचाई हा शेती समोरील एक मोठा ज्वलंत प्रश्न असून वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे मजूर लावून शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. कारण सर्वात जास्त खर्च जर पाहिला तर शेतकऱ्यांचा हा मजुरांवर होत असतो. त्यातल्या त्यात जर आपण पिकांच्या अंतर मशागतीचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा पिकांच्या कोळपणीवर आणि तण नियंत्रणासाठी करावी लागणारी निंदणीवर होत असतो.
परंतु या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आता आंतरमशागतीसाठी बैलांऐवजी यंत्राचा वापर होऊ लागला आहे व त्यातीलच एक महत्त्वाचे यंत्र म्हणजे पावर टिलर मशीन होय. हे यंत्र खूप महत्त्वपूर्ण असून शेतकरी बांधवांसाठी कमी खर्चामध्ये आंतरमशागतीचे काम पार पाडू शकते.
पावर टिलर मशीन आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
तण नियंत्रणाकरिता मजुरीवर खूप मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. परंतु मजूर टंचाईमुळे बऱ्याचदा मजूर वेळेवर मिळत नाही व तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर शेतात वाढतो व यामुळे उत्पादनात देखील मोठी घट येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पावर टिलर मशीन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे.
महत्वाचे म्हणजे या यंत्रासाठी महाडीबीटीच्या अंतर्गत अनुदान मिळवण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अर्ज देखील करता येतो. पावर टिलर मशीन हे कोळपणी करता अत्यंत उपयुक्त यंत्र असून वजनाने देखील हलके आहे. पिकांच्या मध्यभागातील तणनियंत्रण आणि जमिनीच्या मशागतिकरीता हे यंत्र फायद्याचे आहे.
पावर टिलरचे स्वरूप
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेले हे एक महत्त्वाचे यंत्र असून मजुरी वरचा खर्च कमी करण्याकरिता हे यंत्र उपयोगी ठरणार आहे. या यंत्राच्या साह्याने पिकांची कोळपणी तसेच डवरणी अतिशय उत्तम पद्धतीने करता येते. शेतीसाठी किंवा सोयाबीनच्या अंतरमशागतीकरिता 63 इंजिन क्षमता असलेले दोन स्ट्रोकचे पावर टिलर महत्त्वपूर्ण ठरते. पट्टा पद्धतीच्या सोयाबीनमध्ये देखील हे उपयुक्त ठरते.
हे पेट्रोल चलित मशीन असून यामध्ये पेट्रोल टाकताना ऑइलचा वापर करणे गरजेचे असते. एका एकर क्षेत्राच्या कोळपणी करिता याला एक ते दीड लिटर इतके पेट्रोल लागते. म्हणजेच तुम्हाला एक एकर कोळपणीकरता साधारणपणे दीडशे ते दोनशे इतका खर्च येईल.या यंत्राला खाली मजबूत असे पाते दिलेले असतात. हे चालवण्याला देखील खूप सोपे असते. तसेच या यंत्र खरेदीवर अनुदानाची सुविधा देखील उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे यंत्र घेऊन अंतर मशागतीवरचा खर्च कमी करावा.