Pomegranate Farming : ‘हे’ पवार आहेत राज्यातील डाळिंब शेतीतील मास्टर ! वाचा ऊसतोड कामगार ते दोन कोटींचा बागायतदार ! असा प्रवास

Ahmednagarlive24 office
Published:

Pomegranate Farming :- नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे प्रामुख्याने डोळ्यासमोर डाळिंब आणि कांदा ही पिके येतात. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा आणि मालेगाव हा परिसर डाळिंब या फळ पिकासाठी खूप प्रसिद्ध होता.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणावर मर आणि तेल्या या रोगांनी थैमान घातल्यामुळे बऱ्याचशा डाळिंब बागा काढून टाकल्या. परंतु आता नव्याने डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून पुन्हा या तालुक्यांना गत वैभव प्राप्त होईल अशी शक्यता आहे.

याच मालेगाव तालुक्यातील सातमाने या छोट्याशा गावातील रवींद्र पवार यांनी डाळिंब शेतीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून पूर्ण राज्यांमध्ये त्यांनी डाळिंब मास्टर किंवा आदर्श डाळिंब बागायतदार अशी ओळख निर्माण केलेली आहे. रवींद्र पवार यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

ऊसतोड मजूर ते प्रसिद्ध डाळिंब बागायतदार असा खडतर प्रवास

रवींद्र पवार यांची वडिलोपार्जित घरची अडीच एकर कोरडवाहू जमीन व त्यामध्ये कसेतरी पोट भरेल एवढेच धान्य पिकत होते. मध्येच त्यांच्या वडिलांचे निधन झाले व घरात मोठे असलेल्या रवींद्र पवार यांच्यावर अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी आली व ही घटना प्रामुख्याने 1983 या वर्षीची आहे.

घरची जबाबदारी आल्यामुळे शिक्षण सोडावे लागले.परंतु पोटासाठी पडेल ते काम करण्याची वेळ पवार यांच्यावर आली. 1983 मध्ये त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे व विहीर खोदण्याचे कामे देखील केली. एवढेच नाही तर 84 ते 87 या चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये परिसरातील रावळगाव साखर कारखाना ऊसतोड मजूर म्हणून देखील काम केले.

त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच 1986 च्या दरम्यान त्यांचे लग्न झाले. राजेंद्र पवार व त्यांच्या पत्नी सुरेखा तसेच आई यांनी अफाट कष्टाने घरच्या घरी विहीर खोदायचे ठरवले व विहीर खोदली. विहीर तर खोदली परंतु विहिरीवर मोटर बसवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

अशावेळी रवींद्र पवार यांचे सासरे त्यांच्या मदतीला धावले व त्यांनी मोटर बसवण्यासाठी मदत केली. या ठिकाणाहून रवींद्र पवार यांचा डाळिंब बागेचा प्रवास हा सुरू झाला.

अशा पद्धतीने आले डाळिंब बागेकडे

दरम्यानच्या कालावधीमध्ये शेती महामंडळाच्या सेक्शन फार्मचे व्यवस्थापक संपतराव मोरे यांच्या माध्यमातून रवींद्र पवार यांना डाळिंब लागवडीचा सल्ला मिळाला. परंतु पैसा नसल्यामुळे डाळिंबाची लागवड कशी करावी हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

याच कालावधीमध्ये त्यांचा मोठा मुलगा निलेशचा जन्म झाला व त्या निलेशच्या कानातील ज्या काही सोन्याच्या बाळ्या होत्या त्या विकल्या आणि डाळिंब लागवडीसाठी पैसा उभा केला. या पैशातून त्यांनी 30 गुंठे मुरमाड जमिनीवर डाळिंब लागवडीची तयारी केली व गणेश या डाळिंबाच्या वाणाची 150 झाडे लावली.

परंतु तरीदेखील नियती त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. डाळिंब लावल्यानंतर दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडला. परंतु यामध्ये हार न मानता त्यांनी वीस घागरी विकत घेतल्या व पती-पत्नी मिळून विहीरीतून पाणी उपसून घागरी भरण्याचे काम सुरू केले.

बैलगाडीतून पाणी आणून प्रत्येक झाडाला पाणी द्यायचे असा दिनक्रम त्यांनी सुरू केला व बाग मोठ्या कष्टाने जगवली. त्या कालावधीमध्ये देखील त्यांनी विहीर खोदण्याची कामे केली. परंतु कष्टाने बाग जोपासला व तिसऱ्या वर्षी बाग धरला. यामध्ये देखील कुठलाही अनुभव नसल्यामुळे कच्च्या फळांची तोडणी करण्यात आली व एकूण अकरा हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले.

परंतु या उत्पन्नातून त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागला. नंतर त्यांनी हळूहळू पाऊल टाकत डाळिंब बागेमध्ये प्रगती करायला सुरुवात केली. डाळिंब सोबतच त्यांनी मोसंबी तसेच आंबा व संत्री अशी मिश्र लागवड करून पाहिली. परंतु यामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.

म्हणून त्यांनी डाळिंबावर सर्व लक्ष केंद्रित केले. एवढेच नाही तर कांदा तसेच स्ट्रॉबेरी, पपई, शेवगा आणि सीताफळ सारख्या फळबागा आणि कारनेशन व लिली तसेच जरबेरा या फुल पिकांचे देखील प्रयोग करून पाहिले.

त्यांनी या माध्यमातून जमिनी खरेदी केली व आज स्वतःचे त्यांच्याकडे 60 एकर शेती व कराराने घेतलेली तीस एकर अशी 85 एकर शेती असून यामध्ये त्यांनी डाळिंब लागवड केलेली आहे. यातील थोडेसे क्षेत्रामध्ये त्यांनी सीताफळ व अन्य पिके लावले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर व बाजारपेठेचा अभ्यास या दृष्टिकोनातून नियोजन करत त्यांनी यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

कशी आहे त्यांची डाळिंब शेती?

त्यांनी सुमारे 85 एकरामध्ये सुपर भगवा या डाळिंब पिकाचे लागवड केलेली असून 14 बाय दहा फूट अंतर ठेवले आहे व एकरी झाडांची संख्या 311 आहे. बाजारपेठेतील जोखीम कमी व्हावी व दर्जा टिकावा याकरिता त्यांनी 85 एकराचे तीन बहर घेता यावेत या दृष्टिकोनातून तीन समान भाग केले आहेत.

यामध्ये पहिल्या भागात मृग, दुसऱ्या भागात हस्त आणि तिसऱ्या भागात आंबिया बहाराचे नियोजन ते करतात. एका भागामध्ये फक्त एकच बहर ते घेतात. तसेच डाळिंबावर येणाऱ्या तेल्या रोगाचे नियंत्रण करण्याचे तंत्र त्यांनी आटपाडी, सांगोला यासारख्या डाळिंब उत्पादक पट्ट्यामध्ये फिरून आत्मसात केलेले आहे.

कमीत कमी सिंचन व अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केले तर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो हे त्यांनी अभ्यासले आहे. त्यानुसार ते त्यांच्या बागेची नियोजन ठेवतात. त्यांचे पाणी व्यवस्थापन पाहिले तर उन्हाळ्यात प्रति झाड दुसऱ्या दिवशी चाळीस लिटर, हिवाळ्याच्या कालावधीत 15 ते 20 लिटर तर पावसाळ्यात वापसा स्थिती जशी असेल व जमिनीचा प्रकार यानुसार पाण्याचे नियोजन करतात.

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न

डाळिंब पिकाच्या विश्रांती कालावधीत पावसाळ्यामध्ये हिरवळीचे खत उपलब्ध व्हावे यासाठी ताग किंवा धैचा यासारख्या पिकांची लागवड करतात तसेच बायोगॅस स्लरीचा वापर करून जमिनीतील गांडूळाचे नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतात.

तसेच पिकांचे उरलेले अवशेष व पालापाचोळा, तण तसेच मका चार्‍याची व सोयाबीनची कुट्टी व उसाची पाचट वापरून ते सेंद्रिय आच्छादन देण्यावर भर देतात. हे अवशेष जागेवरच कुजवले जातात. प्रति झाड सुमारे 34 किलो म्हणजेच दोन क्रेट शेणखताचा पुरवठा करतात.

एवढेच नाही तर बोन मिल तसेच शेंगदाणा पेंड वगैरे वापर करतात. त्यांचे खत व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक खतांच्या तुलनेत ते जैविक सेंद्रिय निविष्ठांवर जास्तीचा भर देतात. याकरता त्यांनी बायोडायनामिक पद्धतीने कंपोस्ट खत बेडनिर्मिती देखील केलेली आहे.

सुडोमोनास व ट्रायकोडर्मासारख्या मित्र बुरशींचा वापर करतात. एकात्मिक पिकसंरक्षणासाठी फेरोमोन ट्रॅप्स, फळमाशी सापळे तसेच निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क इत्यादींचा वापर करतात. हवामान बदलानुसार सिंचन व कीड तसेच रोग इत्यादी बाबत पूर्व सूचना देणारे सेंन्सर आधारित स्वसंचलित हवामान केंद्र त्यांनी शेतात बसवले आहे. शेताच्या अवतीभवती साग व निलगिरीची लागवड करून वन भिंतींची रचना उभारली आहे.

अशा पद्धतीचे आहे विक्री व्यवस्थापन

निर्यातीला योग्य असे 350 ते 400 ग्राम व जास्तीत जास्त 900 ग्राम वजनापर्यंतचे फळ ते मिळवतात. युरोप तसेच मलेशिया, रशिया, दुबई, बांगलादेश येथे दहा वर्षापासून ते डाळिंबाचे निर्यात करतात. यामधील सर्वात जास्त निर्यात ते बांगलादेशात करतात. देशांतर्गत बाजारपेठेचा विचार केला तर कोलकाता व जयपूर, इंदोर, सुरत, अहमदाबाद व वाराणसी येथे विक्री करतात.

झोपडी ते बंगला असा प्रवास

शेतीतून चांगले उत्पन्न मिळायला लागल्यानंतर त्यांनी घर किंवा बंगला यांना प्राधान्य न देता शेतीचा विकास करण्यावर अगोदर भर दिला. बारा वर्षे संपूर्ण कुटुंबाने झोपडीत आयुष्य काढले व आज त्यांचा प्रवास बंगल्यापर्यंत झालेला आहे.

ऊसतोड मजुराचा प्रवास हा झोपडी पासून बंगल्यापर्यंत झालेला खूप कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये त्यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते डाळिंब रत्न पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe