संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. अस्मानी सुलतानी संकटे पाचवीलाच पुजलेली. वाढती उष्णता शेतकऱ्यांच्या मालासाठी अपायकारक ठरत आहे.
उष्णतेमुळे शेतातील टोमॅटो पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असल्यामुळे टोमॅटोचे पीक वाया जाण्याची भीती आहे. त्यात टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. परंतु जसजसा उन्हाचा पारा वाढला तसतसा टोमॅटोच्या बाजारभावात घसरण झाली. तोडलेला शेतमाल नारायणगाव मार्केटपर्यंत जाण्याचा खर्चदेखील मिळत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे प्लॉट सोडून दिले आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटोला लाल कोळी आळीने त्याच बरोबर फुलेदेखील गळून पडत आहे. टोमॅटो लवकर पिकून लाल होत आहे. पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढत गेला. अचानक आलेल्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या किटकनाशकांची फवारणी केली.
मात्र त्याचा फायदा न झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली. टोमॅटो पिकाला एकरी साधारण दीड ते पावणे दोन लाख रुपये उत्पादन खर्च होत आहे. पूर्वी जी खते ७० ते ९० रुपये किलोने मिळायचे ती खते आज २०० ते २५० रुपये किलोने घ्यावी लागत आहेत. सध्या टोमॅटोच्या एका क्रेटला १४० ते २०० रुपयापर्यंतच बाजार मिळतो.
टोमॅटो तोडण्याची मजुरी वेगळीच या तुटपुंज्या भावात देणेदारी मिटवायची की घर खर्च चालवायचा, प्रत्येकाला आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार या कृषिप्रधान देशात मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे मत टोमॅटो उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.