कृषी

छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याने 9 बाय 12 च्या खोलीत पिकवले केशर! बाजारात मिळतो केशरला 7 लाख रुपये प्रतिकिलो दर

Published by
Ajay Patil

Saffron Farming:- केशर म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात अगोदर येते ते जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश सारखे राज्य होय.कारण या दोन्ही राज्यातील जे काही थंड वातावरण आहे ते केशर पिकासाठी खूप फायद्याचे आणि पूरक समजले जाते व त्या ठिकाणी केशरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

परंतु जर आपण आता बघितले तर केशरचे उत्पादन देशातील काही भागात देखील काही शेतकऱ्यांनी यशस्वी केल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल. तंत्रज्ञानाचा वापर करून केशरसाठी आवश्यक असलेले तापमान मेंटेन केले जाते व एका खोलीमध्ये केशर पिकवण्याची किमया अनेकांनी साध्य करून दाखवली आहे.

अगदी याच प्रमाणे जर आपण छत्रपती संभाजीनगर मधील उस्मानपुरा परिसरात राहणारे रिटायर्ड कृषी अधिकारी लक्ष्मीकांत अपसिंगेकर यांची जर यशोगाथा बघितली तर त्यांनी नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये केशर पिकवण्याची किमया साध्य करून दाखवली असून त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यांनी त्यांच्या राहत्या घरातील एका खोलीमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला व केशरचे उत्पादन घेतले आहे.

सहा लाख रुपये आला उत्पादन खर्च
अपसिंगेकर यांचा या केशर उत्पादनासाठीचा जर उत्पादन खर्च बघितला तर तो सहा लाख रुपये पर्यंत आलेला आहे. या खर्चामध्ये काश्मीर येथून केशरचे कंद आणणे तसेच हायड्रोपोनिक तंत्रज्ञान बसवणे, आवश्यक असणारे कोकोपीट, पाण्याची निचरा होणारी माती आणि गांडूळ खताचा वापर, लाइटिंग, तापमान मेंटेन करण्यासाठी आवश्यक वातानुकूलित उपकरणे,

केशरची लागवड व देखभाल तसेच काढणी असा एकूण सगळा खर्च त्यांना सहा लाख रुपये इतका आला. केशरच्या उत्तम उत्पादनाकरिता दिवसाचे तापमान 21 अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान आठ अंश सेल्सिअस ठेवणे गरजेचे असते व आद्रता 70 टक्के पर्यंत लागते. लागणारे सगळे वातावरण तंत्रज्ञानाद्वारे कंट्रोल करणे गरजेचे असते.

अशा पद्धतीने केली केशरची लागवड
त्यांनी त्यांच्या नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशर लागवडीची किमया साध्य केली. त्यांनी खोलीमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान बसवले व काश्मीर येथून बाराशे रुपये प्रति कंद याप्रमाणे 80 किलो कंद विकत आणले व त्याची आठ सप्टेंबर 2024 मध्ये लागवड केली.

साधारणपणे लागवडीनंतर 50 दिवसानंतर या कंदाला फुले यायला सुरुवात झाली व एका कंद फुलात तीन केशरच्या काड्यांचे उत्पादन मिळते. त्यांनी जे काही ८० किलो कंद आणले त्यापैकी 40 किलो कंदाला सध्या फुले लागली व 40 किलो कंदाचे वजन आठ ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे होते.त्यामुळे त्या 40 किलो कंदाला फुलेच लागली नाहीत.

त्याची परत मातीत लागवड करून कंद निर्मिती केली जात आहे. काश्मीरमध्ये सहाशे रुपये इतका कंदाचा दर आहे. परंतु अपसिंगेकर यांना मात्र बाराशे रुपये खर्च आला व या सगळ्या गोष्टींवर मात करत त्यांनी 30 ग्रॅम केशर उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे.

केशरला आहे स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी


केशरची मागणी जगातील काही प्रमुख देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असून मागणीच्या तुलनेत मात्र केशरचे उत्पादन खूपच कमी आहे. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण केशरचे दर पाहिले तर ते किलोला सात लाख रुपये पर्यंत मिळतात.

यामुळेच आता उष्णकटिबंधातील परिसरामध्ये देखील केशर उत्पादनाला आता प्राधान्य मिळू लागले आहे. सहाशे ते सातशे रुपये ग्राम पर्यंत बाजारात त्याची विक्री होते. केशर हे एक मसाला पीक असून त्याचा औषधी तसेच भाजी, दूध व प्रक्रिया उद्योग इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

Ajay Patil