अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
याच पार्शवभूमीवर आज राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे.
तसेच केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान सोयाबीनचा दर ११ हजार रुपयांवरून कोसळून केवळ २० दिवसांमध्ये ४ हजार रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत.
शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन मालाची तातडीने विक्री करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल अशी चिन्हे आहेत,
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.