Pomegranate Crop Management:- योग्य व्यवस्थापन आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीमध्ये कुठलेही पीक घेणे आता शक्य झालेल्या आहे. जरी जमीन कोणत्याही प्रकारची असली तरी तंत्रज्ञान मदतीला आल्यामुळे आता शेतीमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच स्वतःच्या कष्टाला देखील तितकेच महत्त्व असते.
या सगळ्या जोरावर शेतकरी आता फळबाग लागवडीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.फळबागांसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या व्यवस्थापनाच्या बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करून भरघोस उत्पादन कसे मिळवता येते? याबद्दल अनेक शेतकऱ्यांची उदाहरणे आपल्याला दिसून येतात.
याच पद्धतीने जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या सिल्लोड तालुक्यातील गव्हाली या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या गावचे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे विलास आणि त्रिंबक शिंदे या दोन भावांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना व शेतीत येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
या दोन्ही भावांनी खडकाळ जमिनीवर भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली व दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणीपुरवठा करून बाग जगवली व या बागेतूनच त्यांनी आज दहा लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.
शिंदे बंधूंची डाळिंब बागेची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या गव्हाली या दुष्काळी पट्ट्यातील गावाचे रहिवासी असलेले त्र्यंबक शिंदे व विलास शिंदे या दोन भावांनी खडकाळ जमिनीवर भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली व ती यशस्वी देखील करून दाखवली.
विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत प्रसंगी टँकरद्वारे बागेला पाणी पुरवून त्यांनी बाग जगवली व याच बागेने त्यांना आज लाखोत उत्पन्न दिले आहे. त्यांनी मेहनतीने व तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम असे दर्जेदार डाळिंब उत्पादित केलेला आहे.
शिंदे बंधूंनी निर्यातक्षम आणि आधुनिक डाळिंब बागेचे शेतीतंत्रज्ञान स्वतःमध्ये अवगत केले व त्यानंतर सगळ्या बागेचे नियोजन केले. शिंदे बंधूंचे महत्वाचे काम म्हणजे त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील या तंत्रज्ञानाची माहिती देऊन इतरांना देखील डाळिंब बाग लावण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
त्यांनी दोन एकर शेतीमध्ये 12 बाय आठ अंतरावर डाळिंबाच्या भगव्या जातीच्या जवळपास सातशे रोपांची लागवड केली. मृग नक्षत्राच्या अगदी सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात त्यांनी बहर घेतला व त्यानंतर पाणी एक दिवसाआड पुरवले. डाळिंबाचे जर आपण क्षेत्र पाहिले तर ते बऱ्यापैकी आता वाढताना दिसून येत आहे.
परंतु मर आणि तेल्या सारख्या रोगांना बऱ्याच डाळिंब बागा बळी पडताना दिसून येत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून विलास शिंदे यांनी योग्य प्रमाणे फवारणीचे नियोजन केले व चांगल्या प्रतींचे औषध फवारले. हस्त नक्षत्रात उष्ण व दमट हवामाना असल्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव पटकन होतो.
त्यामुळे अगोदरच हवामानाचा अभ्यास करून उपाय योजना करण्यावर शिंदे बंधूंनी भर दिला. त्यामुळे त्यांच्या बागेतील एकही झाड रोगाला बळी पडले नाही. सुरुवातीला या सातशे डाळिंबाच्या झाडांपासून त्यांनी पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यांचे काही खात्रीशीर व्यापारी असून हे व्यापारी बांधावर येऊन जागेवरच शंभर रुपये किलो प्रमाणे डाळिंब खरेदी करत आहेत.
दुष्काळात टँकरने पाणी पुरवून जगवली बाग
शिंदे बंधूंनी जेव्हा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागली तेव्हा टँकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाच्या बागेचे संगोपन केले व खडकाळ, माळरानाच्या जमिनीवर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून चांगले उत्पादन मिळवले आहे. तसेच त्यांनी पावसाचे व विहिरीतील पाणी शेततळ्यामध्ये साठवून फळबागेला पाणी व्यवस्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले व त्यातूनच आज त्यांना हे उत्पादन मिळाले आहे.