कृषी

‘शिवाई’ देईल एका झाडापासून 8 ते 9 क्विंटल चिंचेचे उत्पादन! संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केला चिंचेचा वाण

Published by
Ajay Patil

Variety Of Tamarind Crop:- शेती क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून शेतीचा विकास या सगळ्यांमध्ये देशातील कृषी विद्यापीठे आणि अशा विद्यापीठांतर्गत येणारी फळ संशोधन केंद्र व कृषी संशोधन संस्था यांचा खूप मोलाचा सहभाग आहे.

शेतीमध्ये फायदेशीर ठरेल असे वेगवेगळे तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देऊ शकतील अशा वाणांची निर्मिती यामध्ये देखील कृषी विद्यापीठाची भूमिका कौतुकास्पद अशी राहिलेली आहे. फळपिके असो किंवा इतर पिके या सगळ्यांमध्ये दर्जेदार उत्पादन देणारे वाण कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने नुकताच विकसित केलेला चिंचेचा शिवाई या वाणाबद्दल जर माहिती घेतली तर नक्कीच ही एक चिंच उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी आहे असेच म्हणावे लागेल.

नुकतीच 5 ऑगस्ट 2024 रोजी उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसारणासाठीच्या 31 व्या केंद्रीय उपसमितीची बैठक झाली व या बैठकीत चिंचेच्या शिवाई या वाणाला महाराष्ट्र राज्यात लागवडीत राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठीची मान्यता देण्यात आली.

त्यामुळे आता चिंच उत्पादक किंवा ज्या शेतकऱ्यांना चिंचेची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणारा वाण उपलब्ध झाल्यामुळे नक्कीच एक दिलासा मिळणार आहे.

काय आहे शिवाई या चिंचेच्या वाणाची वैशिष्ट्ये?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवाई वाणाच्या चिंचेची लांबी जर बघितली तर ती 20.43 सेंटीमीटर व रुंदी 3.13 सेंटीमीटर पर्यंत आहे.

2- एका फळाचे सरासरी वजन जर बघितले तर ते 35.33 ग्रॅम आणि प्रतिकिलो गराचे वजन 497.7gm इतकी आहे.

3- तसेच या फळांमधील जर आपण विद्राव्य घटकांचे प्रमाण बघितले तर ते 41.6% व आम्लता 21.2% पर्यंत आहे.

4- तसेच चिंचेतील चिंचोक्यांचा आकार मोठा आहे व संख्या देखील कमी असल्यामुळे साहजिकच आतमध्ये गराचे प्रमाण जास्त आहे.

5- चिंचेचा हा शिवाई वाण उत्पादनाच्या बाबतीत खूपच सरस असून एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे.

6- तसेच कोरडवाहू भागासाठी लागवडीस उपयुक्त असून कीडरोधक असल्याने खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा वाण आहे.

7- सध्या चिंचेला चॉकलेट तसेच जेली व इतर खाद्यपदार्थांच्या उद्योगांमध्ये चांगली मागणी आहे व फटाके उद्योगांमध्ये देखील चिंचोकांच्या पावडरला मागणी असल्याने चिंच लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते व या दृष्टिकोनातून चिंचेचा शिवाई वान शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो.

Ajay Patil