सध्या मार्केटमध्ये सर्वच भाजीपाल्याने तेजी धरली आहे. बहुतांश भाजीपाला हा ५० रुपये किलोंच्याच पुढे मिळतो. दरम्यान सध्या टोमॅटोने मात्र आपली लाली अधिकच तेज केली आहे.
जवळपास महिनाभरापासून १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास असणाऱ्या टोमॅटोचे बाजारभाव अद्यापही कमी झालेले नाहीत. सध्या किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे.
टोमॅटोचा सध्या संपूर्ण राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच सध्या टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले दिसत आहेत. सध्या विविध बाजार समितीमध्ये ६० ते ७० रुपये दराने विक्री होत
असून किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर वाढू लागले आहेत.
किती दिवस राहणार तेजी
सध्या मार्केटमध्ये तुटवडा जाणवत असल्याने टोमॅटोची तेजी वाढलेली आहे. ही भावात झालेली तेजी किती दिवस राहील असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर साधारण टंचाईमुळे आणखी एक महिनाभर तरी टोमॅटोची तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या कर्नाटकी टोमॅटोवरच मदार
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ जुलैला २०८ टन टोमटोची आवक झाली होती. होलसेल मार्केटमध्ये २० ते ४२ रुपये किलो दराने विक्री होत होती. गुरुवारी बाजार समितीमध्ये फक्त १३७ टन आवक झाली असून बाजारभाव ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
एका आठवड्यात टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत. मुंबई, नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो २०० ते १२० रुपये दराने विकले जात आहे. सद्यः स्थितीमध्ये बंगळुरू, सातारा, सांगली, पुणे परिसरातून मुंबईमध्ये आवक होत आहे.