सध्या आपल्याला शेती क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये असे अनेक तरुण-तरुणी दिसून येत आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतलेले असून मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरीवर असताना त्यांनी या नोकऱ्या सोडल्या आणि शेती सारख्या इतर व्यवसायांमध्ये पडून यशस्वी देखील झाले आहेत.
परंतु हे जेवढे ऐकायला किंवा वाचायला सोपे असते, तितके या पद्धतीचा निर्णय घेऊन अनिश्चित वातावरण असलेल्या मार्गावर चालून यशस्वी होणे हे वाटते तितके सोपे नसते. परंतु अशा तरुण-तरुणीच्यामध्ये असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची उर्मी आणि जिद्द व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिच्याशी दोन हात करत मार्ग काढत चालण्याची वृत्ती खूप महत्त्वाचे ठरते.
या सगळ्या गुणांमुळेच असले व्यक्ती किंवा तरुण-तरुणी हे यशस्वी होतात. अशाच प्रकारे जर आपण छत्तीसगड राज्याच्या स्मरिका चंद्राकर या तरुणीची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला धरूनच आहे. या तरुणीने पुण्यामध्ये कार्पोरेट क्षेत्रात पाच वर्षे नोकरी केली. परंतु काहीतरी वेगळे करावे हे मनात असल्यामुळे ही नोकरी सोडली आणि शेतीचा रस्ता पकडला व आज शेतीतून ही तरुणी तब्बल वार्षिक दीड कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरला आणि आज करते दीड कोटींची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्तीसगड राज्यातील चारमुडीया या छोट्याशा गावातून शेतकरी कुटुंबात स्मरिका यांचा जन्म झाला व त्यांचे बालपण संपूर्ण भात शेती पाहण्यात व त्यामध्ये रमण्यातच गेले. त्यामुळे लहानपणापासूनच शेती विषयी असलेले महत्त्वाचे बारकावे त्यांना वडिलांकडून शिकायला मिळाले.
परंतु जीवनामध्ये वयाने मोठे होत असताना शिक्षण सुरू झाले व पुढे उच्च शिक्षणासाठी रायपूर या ठिकाणी जाऊन कॅम्पुटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व पुण्यातून एमबीए देखील केले. त्यानंतर पुण्यामध्ये पाच वर्ष बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी केली. परंतु मध्यंतरीच्या कालावधी ते कुटुंबाकडे रायपूर या ठिकाणी गेले व या सुट्टीमध्ये घरच्यांसोबत शेतात जायला सुरुवात केली.
शेतीमध्ये उत्पन्न आणि नफा कसा वाढवता येईल यावर त्यांनी त्यांच्या वडिलांशी चर्चा देखील केली. या चर्चेतून भात पिकाऐवजी भाजीपाला पिके पिकवणे हे जास्त फायद्याचे राहील हे त्यांनी ठरवले व हळूहळू त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतर 2021 मध्ये नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णपणे वेळ शेतीकडे दिला.
वीस एकरपेक्षा जास्त जमिनीवर भाजीपाला पिकवायला सुरुवात केली व गेल्या तीनच वर्षांमध्ये सुमारे ते एकरी 50 टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाले. जर आपण गेल्या आर्थिक वर्षाचा विचार केला तर स्मरिका यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल केली. त्यांनी पिकवलेले टोमॅटो पाटणा तसेच कोलकाता, दिल्ली, विशाखापट्टणम, बेंगलोर व देशातील इतर अनेक शहरांमध्ये देखील पाठवायला सुरुवात केली.
अशाप्रकारे केली शेती करायला सुरुवात
याबाबत एका मुलाखतीमध्ये माहिती देताना त्यांनी सांगितले होते की, भाजीपाला पिकांची लागवड करण्याआधी त्यांनी माती सुपीक करण्याचे ठरवले व याकरिता गांडूळ व शेण खताचा वापर केला. तसेच शेतामध्ये सिंचन पद्धतीत सुधारणा केली व त्याचाच परिणाम असा झाला की त्यांना पहिल्याच वर्षी एकरी 50 टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले.
ते भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटोच नाही तर काकडी तसेच वांगी, भोपळा इत्यादी भाजीपाला पिकांची देखील लागवड करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही जर भाताची लागवड कराल तर वर्षातून ती दोनदाच करता येते.
परंतु भाजीपाला पिके तुम्ही संपूर्ण वर्षभर अनेक वेळा लागवड करू शकतात व त्यापासून उत्पन्न मिळवू शकतात. सध्या ते 20 एकर शेती करत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी पंधरा एकर शेती करण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे या शेतीकामांमध्ये स्मरिका यांना त्यांचे वडील आणि भावाची देखील मोलाची मदत होते.