कृषी

ज्वारीने शेत, शिवारं बहरली ! पावसाने ज्वारी पिकाला संजीवनी

Published by
Ahmednagarlive24 Office

ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अनधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते. हे कमी पाण्यावर येणारे पीक असून, या पिकाची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ते घेतले जाते.

या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत ज्वारी पिकातून हमखास चांगले उत्पादन मिळेल. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने ज्वारी पिकाला संजीवनी मिळाली असून, ती चांगलीच बहरली आहे. शिवाय पावसामुळे जलसाठा उपलब्ध झाल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने ती आणखीच जोमदार आली.

पारनेर तालुक्‍यातील सुपा कोरडवाहू पट्टयातील ज्वारी हे मुख्य पीक. कुटुंबासाठी वर्षभर लागणारे धान्य व जनावरांसाठी वैरण मिळत असल्याने या परिसरातील शेतकरी दरवर्षी हमखास ज्वारीचे पिक घेतात.

यंदा ज्वारी पेरणीनंतर ‘पीक उगवण होण्यापूर्वी अवकाळी पाऊस ‘व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते, पण आता वातावरण निवळले असून परिसरात ‘पाणीसाठाही असल्याने सुपा शिवारातील गहू, हरभरा, ज्वारी ही सर्वच पिके बहरु लागली आहेत.

ज्वारीचे उत्पन्न किती होईल, यापेक्षा पशुधनासाठी चारा उपलब्ध होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्‍त करत आहेत. सुपा परिसरातील सर्वच गावांमधील ज्वारीचे पिक उत्तम आहे शिवाय सध्या ज्वारीला भावही चांगला मिळत आहे.

ज्वारीच्या ताटांना असलेल्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेल्या कणसांच्या गोळ्यामुळे परिसरात यंदा हुरडा पार्ट्या रंगणार हे नक्की. लवकर पेरणी केलेल्या ज्वारीला आता कणसे येऊन त्यामध्ये दाणे भरत आहेत. या ज्वारीच्या कणसातील दाणे टिपण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या पक्षांच्या नजरा आता ज्वारीकडे लागल्या आहेत.

सकाळी व संध्याकाळच्या वेळी पाखरांचे थवे कणसातील दाणे खाण्या साठी येतात, त्यामुळे शेतकऱ्याला पिकाची राखण करावी लागत आहे. ज्वारी पासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने व ऊस तोडणीनंतर जनावरांच्या वाळल्या चाऱ्याचा प्रश्‍न सुटत असल्याने दुहेरी फायदेशीर असलेल्या ज्वारी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.

Ahmednagarlive24 Office